अंबरनाथच्या रेल्वे पादचारी पुलाची त्वरित दुरुस्ती करा

सीएसटी पूल दुर्घटनेसारखी दुर्घटना टाळण्यासाठी अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी भाजपाचे ठाणे पालघर विभागीय उपाध्यक्ष आणि विभागीय रेल्वे बोर्ड सदस्य किसनराव तारमळे यांनी केली आहे.

Mumbai
अंबरनाथ स्टेशन मास्तरांना निवेदन

मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावर गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास पादचारी पूल कोसळल्याच्या दुर्दैवी घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्टर विजय वानखेडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे तारमळे यांनी ही मागणी केली आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ तसेच ३ ला जोडणाऱ्या पुलाची अवस्था दयनीय झाली असून त्याला तडे गेले आहेत. त्यातच या पुलाला सरकता जिना जोडण्यात आल्याने पुलावर भार वाढला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी याठिकाणी सीएसटी पूल दुर्घटनेसारखी घटना घडू शकते अशी भीती तारमळे यांनी व्यक्त केली आहे. रेल्वे प्रशासनाने याची वेळीच दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला असल्याचेही किसनराव तारमळे यांनी स्पष्ट केले आहे.

डोंबिवलीत ही धोकादायक पूल

डोंबिवली रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पुलावरुन चालतानाही अक्षरशः हादरे बसत आहेत. त्यामुळे या पुलावरून नागरिक जीव मुठीत घेऊन चालतात. एल्फिस्टन पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून धोकादायक पूलांची पाहणी करून ऑडीट करण्यात आले होते. त्यावेळी डोंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाची पाहणी करून हा पूल काही दिवस बंद ठेवण्यात आला होता. मात्र काही दिवसानंतर हा पूल पून्हा सुरू करण्यात आला. हा पूल पूर्व व पश्चिम दोन्ही दिशेकडील स्कायवॉकला जोडण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी संध्याकाळी दोन लोकल आल्यानंतर पूलावर प्रवाशांची खूपच गर्दी होते. त्यावेळी पुलावरून चालताना पूल अक्षरश: हालत असल्याचे प्रवाशांचे म्हणणं आहे. त्यामुळे या पुलाची तातडीने डागडुज्जी करणे महत्वाचे आहे.

दुर्घटने आधी दुरुस्तीची मागणी

हा पूल जुना आणि अरूंद असल्याने गर्दीच्यावेळी नवीन पुलाचा वापर करावा असे फलकही पुलावर लावण्यात आले आहे. मात्र एखादी दुर्घटना घडल्यानंतर डोंबिवलीकरांनी केवळ श्रध्दांजली व्हायची का? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. त्यामुळे सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर डोंबिवलीचा धोकादायक पूलाचा प्रश्नही पून्हा एकदा चव्हाटयावर आला आहे. त्यामुळे भविष्यात दुर्घटना घडण्याअगोदर रेल्वे प्रशासनाकडून दखल घेतली पाहिजे, अशी मागणी डोंबिवलीकर प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here