घरUncategorizedमुंबईला द्यायचं नाही, ओरबाडून खायचंय!

मुंबईला द्यायचं नाही, ओरबाडून खायचंय!

Subscribe

ठेकेदारांच्या माध्यमातून करोडोंचा मलिदा खाऊन राज्यकर्ते आणि अधिकारी ढेकर देतात आणि एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करून मूळ प्रश्न भरकटत ठेवला जातो, तेव्हा या शहरात राहणाऱ्या माणसांचे जीवन सुरक्षित नाही, हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते.

गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेला हा सवाल आहे की, आम्ही सुरक्षित आहोत का? भारतातील एका छोट्या राज्याएवढा ४० हजार कोटींपेक्षा मोठा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेची एवढी रक्कम खरोखर मुंबईकरांच्या पायाभूत सुविधांवर खर्च होते का? ठेकेदारांच्या माध्यमातून करोडोंचा मलिदा खाऊन राज्यकर्ते आणि अधिकारी ढेकर देतात आणि एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करून मूळ प्रश्न भरकटत ठेवला जातो, तेव्हा या शहरात राहणाऱ्या माणसांचे जीवन सुरक्षित नाही, हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते.

मुंबई आणि नामदेव ढसाळांचं एक अनोखं नातं होतं…‘मुंबई मुंबई माझ्याप्रिय रांडे’ या कवितेत नामदेव ढसाळ यांनी मुंबईचं अप्रतिम वर्णन केलंय. ढसाळ यांनी टॅक्सी चालवताना जे पाहिलं-अनुभवलं ते त्यांनी कवितेत उतरवलं. ढसाळ यांच्या शब्दात त्यांना टॅक्सी चालवतानाच खर्या रंगिल्या मुंबईची, इथल्या उघड्या-नागड्या जिनगानीची, तसेच शापित विश्वाची ओळख झाली आणि ती ओळख कवितेच्या रूपाने ढसाळांनी कागदावर उतरवली. ढसाळ म्हणाले होते, कविता लिहिताना जे बघितलं-पाहिलं ते सारं एका फोर्समध्ये बाहेर येऊ लागलं. हा फोर्स असफल ठरलेल्या माझ्या पहिल्यावहिल्या प्रेमाचा होता. कविता लिहिताना परिस्थितीनुसार पहिल्यांदा ढसाळ यांना उद्ध्वस्तपणाची जाणीव झाली आणि त्यांच्या आयुष्याला व्यापून टाकलं.

- Advertisement -

त्यातूनच कविता जन्माला आली… ढसाळ यांच्या कवितेतली मुंबई आजही तशीच आहे. लोक गावकुसातून, खेडोपाड्यातून मुंबईत जगायला येतात आणि किड्यामुंग्यासारखे राहतात. आजचा दिवस कसा जाईल, याची भ्रांत घेऊन जगणारा हा माणूस घरी जिवंत परतेल की नाही, याची काहीच शाश्वती राहिलेली नाही. मुंबई तुंबली, रस्ता खचला, दरड कोसळली, रेल्वेतून माणसेपडली, रेल्वे रुळावर पूल कोसळला, मिठी नदीत माणसे वाहून गेली… एक दोन दिवस बातम्या येतात, चर्चा होते, नातेवाईक रडतात आणि दुसर्या दिवशी काही घडले नाही, अशी मनाची खोटी समजूत घालून तीच माणसे जगायला बाहेर पडतात… भा. रा. तांबेंच्या कवितेसारखी. जन पळ भर म्हणतील हाय हाय… मी जाता राहील काय…

२६ जुलै २००५ चा तो प्रसंग अजूनही अंगावर काटा उभा करतो. एका बँकेतील एक तरुण अधिकारी स्वतःच्या गाडीने आपल्या महिला सहकार्यांना सुखरूप घरी सोडतो आणि घरी परतत असताना हायवेवर पाणी तुंबल्याने गाडी उभी करून पाणी ओसरेल, याची वाट पाहत बसतो. पाणी काही ओसरत नाही, मात्र वाढत जाते. वाढत चाललेले पाणी गाडीत शिरू नये म्हणून तो गाडीच्या काचा बंद करून घेतो. पाणी काही ओसरत नाही आणि गाडीत तो श्वास कोंडून मरण पावतो… दुसर्या दिवशी गाडी फोडून त्याचे प्रेत बाहेर काढावे लागते. त्याचे प्रेत घरी आणल्यानंतर त्या तरुण मुलाच्या आईने फोडलेला हंबरडा अजूनही कान बधीर करतो.

- Advertisement -

मुंबईच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवर मिळून दररोज १८ माणसे मरतात आणि त्यापेक्षा दुप्पट संख्येने जखमी होतात.ही जायबंदी झालेली माणसे जगत असून मरणाच्या यातना आयुष्यभर भोगतात. दरड कोसळून, जमीन खचून, इमारत पडून वर्षाला मुंबईतील माणसे मरतात ती वेगळी आणि त्यामधून निर्माण झाला आहे सवाल, ‘आम्ही सुरक्षित आहोत का?’ पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे ओरडून सांगितले जात असतानाही राज्यकर्ते ढिम्म राहतात आणि खोटे अश्रू काढून जनतेला फसवतात.

गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगणार्या शिवसेनेला हा सवाल आहे की, आम्ही सुरक्षित आहोत का? भारतातील एका छोट्या राज्याएवढा ४० हजार कोटींपेक्षा मोठा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेची एवढी रक्कम खरोखर मुंबईकरांच्या पायाभूत सुविधांवर खर्च होते का ? ठेकेदारांच्या माध्यमातून करोडोंचा मलिदा खाऊन राज्यकर्ते आणि अधिकारी ढेकर देतात आणि एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करून मूळ प्रश्न भरकटत ठेवला जातो, तेव्हा या शहरात राहणार्या माणसांचे जीवन सुरक्षित नाही, हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते.

शिवसेनेचा डबल गेम तर चीड आणणारा आहे. मुंबईत काही झाले की, आपल्या अंगावरील जबाबदारी पाल पडल्यासारखी झटकून देत मेट्रोच्या नावाने खडे फोडायचे. मुंबईत खड्डे पडून अपघात झाले की, ते मेट्रोमुळे झाले, असे सांगितले की, स्वतःला क्लीन चिट देऊन सेना मोकळी होते. लोकांचा प्रश्न आहे की,तुमची काही जबाबदारी आहे की नाही. ‘मी नाही त्यातली कडी लावा आतली,’सारखा हा प्रकार आहे. मराठी माणसाच्या नावाने गळे काढून पुढच्या वेळी महापालिकेची सत्ता येणार नाही, हे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ध्यानात घायला हवे. तुमचा एकेकाळचा मित्रपक्ष भाजप सत्तेच्या दारात उभा आहे, पुढच्या वेळी सत्ता तुमच्या हाती राहील याची काहीच खात्री नाही, हे लक्षात ठेवा.
मुंबई महापालिकेची भाजपची सत्ता अगदी थोडक्यात गेली. फोडाफोडी करून त्यांनी सत्ता मिळवलीही असती, पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी तसे केले नाही, युतीचा धर्म पाळला, असे म्हणण्यापेक्षा राज्य आम्ही सांभाळतो, महापालिकेत तुम्ही राज्य करा, अशी तडजोड झाली. शरद पवार यांच्या सत्तेच्या काळातही तसेच होते.

शिवसेनेला मुंबई आंदण देताना महाराष्ट्रावर आम्ही राज्य करणार आणि मुंबई तुम्ही बघा.. असा त्यांचा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याचा अलिखित करार होता. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होऊन एक तप उलटल्यानंतरही राष्ट्रवादी मुंबईत उभी राहत नाही, हे काय गौडबंगाल आहे. मुंबईत शिवसेनेला रान मोकळे करून देताना काँग्रेस मोठी झाली नाही पाहिजे, हे पवारांचे गणित असते. आता पवारांच्या या गणिताचे पाढे फडणवीस गिरवत आहेत. अन्यथा आम्ही मुंबईचे पहारेकरी होणार, असे वाघाचे दात मोजणार्यांची अवलाद आहे, अशी गर्जना करणार्या फडणवीसांना गेल्या दोन वर्षांत सेनेचा महापालिकेतील एकही भष्ट्राचार दिसत नाही, ही कमाल झाली. मुख्य म्हणजे पहारेकर्याच्या भूमिकेत असलेल्या खासदार किरीट सोमय्या आणि आमदार आशिष शेलार यांचाआवाज अचानक बंद झाला नसता. सगळेच एकमेकांना मिळालेले.

केंद्र, राज्य आणि महापालिका अशा तीन सत्ता केंद्रात मुंबईच्या पायाभूत विकासाची विभागणी झाली आहे. रेल्वेचा कारभार केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. काश्मीरपासून केरळपर्यंत पसरलेली रेल्वे चालते ती मुंबईच्या जीवावर आणि मुंबईकर मात्र लोंबकळत जाणार, दररोज मरणार. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल हे मुंबईकर आहेत. त्यांना मुंबईच्या मरणकळा दिसत असतील, अशी साधी अपेक्षा आहे. काँग्रेस बिनकामाची होती म्हणून लोकांनी बदल करून भाजप सेनेला सत्ता दिली. पण तेसुद्धा मुंबईला काही न देता ओरबाडून खाणार असतील तर त्यांनाही माफ केले जाणार नाही.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -