घरUncategorizedराज्यावर स्वाईन फ्लूचं सावट, आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

राज्यावर स्वाईन फ्लूचं सावट, आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात स्वाईन फ्लूचा वेगाने प्रसार होत असून आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १४५ रुग्णांवर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

हवामानातील बदलामुळे राज्यात सध्या स्वाईन फ्लूचा प्रभाव वाढत असून राजस्थान, गुजरात, पंजाब, जम्मू आणि काश्मिर या राज्यांसोबत महाराष्ट्रतही यंदा या काळात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. यावर प्रतिबंध आणि नियंत्रण आणण्यासाठी सर्वेक्षण, निदान, उपचार, लसीकरण आणि जनजागृती या गोष्टींचा अवलंब होणं गरजेचं आहे. जानेवारी पासून आतापर्यंत जवळपास तीन लाख ५० हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी चार हजार रुग्णांना टॅमीफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. स्वाईन फ्लूच्या १४५ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, सोलापूर या ठिकाणी १० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर, आतापर्यंत १७ रुग्णांचा मृत्यू झाला.

जनजागृतीपर उपाय

स्वाईन फ्लूला रोखण्यासाठी रूग्णांच सर्वेक्षण, निदान, उपचार, लसीकरण आणि जनजागृती या गोष्टींचा अवलंब होणं गरजेचं आहे. सर्वंकष कृती योजना अंमलात आणण्यासाठी विभागाला निर्देश‍ दिले असून स्वाईन फ्लूसंदर्भात प्रबोधनात्मक संदेश तयार करुन हा आजार कसा पसरतो? त्याची लक्षणे? हा आजार होऊ नये म्हणून घ्यायची काळजी. या आजारावरील उपचारांबाबत माहिती यासंदर्भात सामान्यांना माहिती द्यावी. त्याचबरोबर सर्व माध्यमिक शाळांमध्ये जनजागृती करण्यासाठी नर्सेस, आरोग्य सेवक यांची मदत घेऊन मार्गदर्शन करावे.

- Advertisement -

ग्रामीण भागात असणाऱ्या ग्राम आरोग्य स्वच्छता आणि पोषण समिती तसेच शहरी भागात असलेल्या महिला आरोग्य समित्यांच्या सदस्यांची बैठक घेऊन त्यांचे याविषयी प्रबोधन करावे. जेणेकरुन प्रतिबंधात्मक संदेश समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत जाण्यास मदत होईल. राज्यातील बहुतांश ग्रामीण भागात या कालावधीत यात्रा, जत्रा आणि उत्सवांचे आयोजन केले जाते. अशा ठिकाणी स्वाईन फ्लू सदृष रुग्णांचे नियमित सर्वेक्षण केले जात आहे. प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. स्वाईन फ्लूवरील प्रतिबंधात्मक असलेल्या टॅमीफ्लू गोळ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -