घरUncategorizedटिटवाळा : न्यू होम डेस्टिनेशन

टिटवाळा : न्यू होम डेस्टिनेशन

Subscribe

मुंबईतील घरांच्या, जागांच्या किमती या आवाक्याबाहेर गेल्याने नवी मुंबई, कल्याण-बदलापूर-टिटवाळा या पट्ट्यामध्ये लोकवस्तीचा विस्तार आता होऊ लागला आहे. सामान्यांना परवडणारी घरे, पायाभूत सुविधा यामुळे जणू मुंबईच बदलापूर-अंबरनाथ, टिटवाळा या परिसरात स्थलांतरित होत आहे असे म्हणावे लागेल. मुंबईनंतर ठाणे-कल्याण परिसरातही जागांच्या किंमती हळूहळू वाढू लागल्याने सामान्य गृह खरेदीदारांनी बदलापूर-टिटवाळा असे नवीन होम डेस्टिनेशन शोधले आहे. सर्वसामान्य गृह खरेदीदारांना परवडणारी घरे, उत्तम हवामान, निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त लाभलेले आणि टप्प्याटप्प्याने विकसित होणारे ठिकाण म्हणजे टिटवाळा होय.

टिटवाळा धार्मिक स्थळ म्हणून विशेष प्रचलित आहे. तेथील महागणपती मंदिरात नेहमीच भक्तांची गर्दी दिसून येते. दर मंगळवार आणि संकष्टी चतुर्थी तसेच गणेशोत्सवाच्या काळात ही भक्तांची गर्दी विशेष दिसून येते. टिटवाळा येथील महागणपती हा विवाहविनायक म्हणूनदेखील ओळखला जातो. महाभारताच्या काळातील कण्व ऋषींचा आश्रम हा याच परिसरात होता. दुष्यंत-शकुंतलेच्या गंधर्व विवाहानंतर स्वत:च्या नगरात परतलेल्या दुष्यंत राजाला शकुंतलेचा विसर पडला होता, त्यावेळी कण्व ऋषींनी आपली मानस पुत्री शकुंतलेला याच महागणपतीची आराधना करण्यास सांगितली. येथेच शकुंतलेने श्री महागणपतीची पूजा केली आणि दुष्यंताने पुन्हा तिचा स्वीकार केला अशी आख्यायिका आहे. महाभारताच्या काळातील शकुंतलेने पुजलेली श्री महागणपतीची अदृश्य झालेली मूर्ती पुढे माधवराव पेशवे यांना स्वप्नात दृष्टांत मिळाल्याप्रमाणे सध्याच्या मंदिरापाशी असलेल्या तलावाचे काम सुरू असताना त्यांचे कारभारी रामचंद्र मेहेंदळे यांना सापडली.

पुढे चिमाजीअप्पा यांनी वसई किल्ला येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर हे मंदिर बांधण्यात आले असे सांगितले जाते. टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिर इच्छापूर्ती करणारे देवस्थान म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. श्री क्षेत्र टिटवाळा मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे दगडातील असून उत्तम आहे. सुरुवातीस श्री महागणपतीच्या मंदिरातील सभामंडपाचे काम लाकडात केले होते. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात त्याचे पुनर्बांधकाम करण्यात आले. टिटवाळ्याच्या श्री महागणपती मंदिरात सध्या मार्बल फ्लोअरिंग करण्यात आले आहे. मंदिराच्या कळसावरील अष्टविनायकांचे कोरीव काम पटकन भाविकांचे लक्ष सहज वेधून घेते. श्री महागणपती मंदिराजवळच श्री विठ्ठल-रुक्मिणीचे प्रसिद्ध मंदिरदेखील आहे. श्री महागणपती मंदिराप्रमाणेच विठ्ठल-रुक्मिणीच्या या मंदिराला महाराष्ट्रातील इतर धार्मिक स्थळांमध्ये विशेष महत्त्व आहे. पंढरपूर येथील भजनांचा आवाज हा येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात येतो असे सांगितले जाते. महागणपती मंदिराच्या उजव्या बाजूस श्री शंकराचे शिवलिंग आहे तसेच मंदिराच्या उजव्या कोपर्‍यात श्री महागणपती मंदिराचे खूप जुने पुजारी आणि गणेश भक्त वेंगावकर-जोशी यांच्या पादुकादेखील आहेत. गणेश दर्शनासाठी येणारे भक्तजण यांचे आवर्जून दर्शन घेतात.

- Advertisement -

Titwala-ganapati-mandir

टिटवाळा आतापर्यंत धार्मिक स्थान म्हणून प्रसिद्ध होते, परंतु आता टिटवाळादेखील इतर शहरांप्रमाणेच स्वत:चा विकास आणि ओळख घडविण्यासाठी सज्ज होत असल्याचे दिसून येत आहे. टिटवाळा हे कल्याण स्थानकापासून थोड्याच अंतरावर वसलेले मध्य रेल्वेवरील एक स्थानक. ज्याप्रमाणे कल्याण शहराच्या विकासानंतर नागरिकीकरणाची लाट बदलापूर, अंबरनाथ अशा शहरांकडे वळली तशीच ती थोड्या प्रमाणात का होईना टिटवाळ्यापर्यंतदेखील जाऊन पोहोचली आहे. टिटवाळा हा परिसर कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट होत असल्याने कल्याण महापालिकेची परिवहन सेवाही येथे सुरू झाली आहे. जीवनावश्यक वस्तू आणि दैनंदिन सोयी-सुविधा येथे हळूहळू वाढणार्‍या मार्केट, शॉपिग प्लेसेसमधून चांगल्या प्रकारे भागविल्या जात आहेत.

- Advertisement -

टिटवाळ्याची एकूण लोकसंख्या सुमारे साठ-सत्तर हजार असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या दृष्टीने टिटवाळा मतदारसंघ खूप महत्त्वाचा आहे यात वाद नाही. अनेक मोठे बांधकाम व्यावसायिक, येथे आपले नवीन गृहप्रकल्प उभारण्यास सज्ज आहेत. बरेचसे गृहप्रकल्प टिटवाळा येथे उभे राहू लागले आहेत. निसर्गसौंदर्याप्रमाणे टिटवाळा येथील इतर शहरांशी असलेली कनेक्टिव्हिटी ही येथील आणखी एक उजवी बाजू आहे. टिटवाळा येथे जाण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस मेथून सुटणार्‍या कसारा,आसनगाव किंवा टिटवाळा या लोकल ट्रेन उपयोगी येऊ शकतात, काही वर्षांपूर्वी येथे येणार्‍या-जाणार्‍या लोकल्सची संख्या खूप कमी होती. आता स्थिती तशी नाही. अनेक सामाजिक आणि खाजगी स्वयंसेवी संस्थादेखील टिटवाळ्यात इतर मोलाचा हातभार लावत आहे. टिटवाळ्यामध्मे गुंतवणुकीसाठी तसेच गृह खरेदीदारांसाठी आताच मोठी संधी प्राप्त होऊ शकेल, असे काही प्रॉपर्टी तज्ज्ञांचे मत आहे. टिटवाळा येथील स्थानिक प्राधिकरण शासनदेखील टिटवाळा विकासाकरिता अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेत आहे. मालमत्ता बाजारपेठेला टिटवाळा येथेही विकासासाठी भरपूर संधी उपलब्ध असल्याने येत्या काळात अनेक विकसित शहरांप्रमाणेच टिटवाळ्याचे प्रॉपर्टी मार्केट बहरेल आणि धार्मिक क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे टिटवाळा प्रॉपर्टी मार्केटचे हॉट डेस्टिनेशन म्हणून उदयास येईल, असा विश्वास प्रॉपर्टी मार्केटचे जाणकार व्यक्त करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -