धारावीच्या बिझनेस हबला कोव्हिड १९ चा शिक्का

धारावीत होणाऱ्या अनेक लघु मध्यम स्वरूपाच्या व्यवसायातून धारावीत १ अब्ज डॉलर्स इतकी मोठी उलाढाल होत असते. पण कोरोनामुळे याठिकाणच्या सर्व प्रकारच्या व्यवसायावर संकट आले आहे. धारावीत कोरोना घातलेल्या थैमानानंतर आता धारावी पुन्हा एकदा ऑन ट्रॅक येऊ पाहत आहे. पण धारावीत तयार होणाऱ्या उत्पादनांची मागणी कमी झाली आहे. धारावीतून आलेली उत्पादने म्हणून सध्या धारावीतील वस्तुंना मागणी नाही. धारावीची जागतिक पातळीवर कोरोनामुळे निर्माण झालेल्या प्रतिमेमुळे धारावीतील छोटे आणि मोठे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. येत्या दिवसांमध्ये नवरात्री आणि दिवाळीचा सण यासारख्या मोठ्या सणांमध्ये धारावीतून होणाऱ्या उलाढालीवर कोरोनाचे सावट आहे. धारावीतील कुंभारवाडाही अशाच प्रकारच्या संकटातून जात आहे. त्यामुळे मातीचे काम करणाऱ्या व्यवसायालाही कोरोना काळात मोठा आर्थिक फटका बसला आहे.