जिस थाली मे खाते है, उसमे छेद.. जया बच्चन भडकल्या

‘बॉलिवूड आणि ड्रग्ज यांचा संबंध’ हा विषय सध्या देशभर गाजत आहे. याच विषयावर संसदेतही खडाजंगी झाली. लोकसभेत बोलत असताना अभिनेते आणि गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी बॉलिवूडमधील कलाकार ड्रग्ज सेवन करत असल्याचा मुद्दा मांडला होता. त्यानंतर आज राज्यसभेत समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी त्यांचे नाव न घेता पलटवार केला. ‘बॉलिवूडला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. एंटरटेनमेंट इंडस्ट्री दररोज ५ लाख लोकांना रोजगार देते. देशाची आर्थिक स्थिती चांगली नसून काही गोष्टींकडून लक्ष हटवण्यासाठी आमचा वापर केला जात आहे. सोशल मीडियावर आमच्याबद्दल वाटेल ते बोलले जात आहे. आम्हाला सरकारकडून देखील समर्थन मिळत नाही आहे. ज्यांनी या इंडस्ट्रीच्या मदतीने नाव कमावले आहे तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणत आहे.’, अशा शब्दात जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला.