परप्रांतीयामुळे कोळी महिलांवर उपासमारीची पाळी

मुंबई सोडून गेलेले परप्रांतीय श्रमिक लाखोंच्या संख्येने पुन्हा मुंबईत परतू लागले आहे. तसेच त्यांनी अवैध पध्दतीने मुंबईच्या वाडीबंदर येथे भर रस्त्यावर मासळी बाजार सुरु केलाने त्याचा फटका अधिकृत असलेल्या मासळी बाजाराला बसला आहे. वाडीबंदर येथे भर रस्त्यावर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवैधरित्या मासळी बाजार भरतो. या मासळी बाजारात मासे विक्रेत्यांमध्ये परप्रांतीय नागरिकांची मोठी संख्या आहे. हे परप्रांतीय नागरिक बर्फात साठवून ठेवलेल्या शिळे मासे स्वस्त दरात विक्री करत आहेत. त्यामुळे ताजे मासे विक्री करणार्‍या कोळी महिलांकडे  ग्राहक येत नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून परप्रांतीय लोकांचा सर्रासपणे हा अवैध व्यवसाय सुरू आहे. ही बाब मराठी कोळी महिलांनी स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे. मात्र, यावर मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस प्रशासन डोळेझाक करत असल्याने मुंबईतील मराठी कोळी महिलांना उपासमारीची पाळी आली आहे.