नाशिक जिल्ह्यात १५ जागांसाठी १४८ उमेदवार

विधानसभा निवडणुकीत सोमवारी (दि. ७) अर्ज माघारीच्या मुदतीत अनेक नाट्यमय घडामोडींनंतर 15 मतदारसंघांतून 64 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता जिल्ह्यात १४८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून ७२ अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत.

politician

विधानसभा निवडणुकीत सोमवारी (दि. ७) अर्ज माघारीच्या मुदतीत अनेक नाट्यमय घडामोडींनंतर 15 मतदारसंघांतून 64 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता अंतिमतः जिल्ह्यात १४८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून ७२ अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत. माघारीनंतर अनेक मतदारसंघांमध्ये दुरंगी, तिरंगी व चौरंगी लढती होणार आहे. दरम्यान, माघारीच्या अखेरच्या क्षणापर्यंत सर्वच पक्षांमध्ये बंडखोरांना थोपवण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

विधानसभेसाठी अर्ज माघारीच्या दिवशी जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांमध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत २४४ उमेदवारांनी ३४५ अर्ज दाखल केले. छाननीनंतर २१२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. आज माघारीच्या मुदतीत ६४ उमेदवारांनी माघार घेतल्याने १४८ उमेदवार नशीब आजमावणार आहेत. नांदगावमधून सर्वाधिक 13 उमेदवारांनी माघार घेतली. त्याखालोखाल नाशिक पश्चिम मतदारसंघातून 10 जणांची माघार झाली असली तरी अंतिमत: तेथे 19 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे प्रशासनाला या मतदारसंघात दोन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट लावावे लागणार आहेत. तर नाशिक मध्य मतदारसंघामधून एकही माघारी झाली नाही.

बंडोबांच्या तलवारी म्यान

दरम्यान, माघारी घेतलेल्या उमेदवारांमध्ये नाशिक पूर्वमधील मनसेचे अशोक मुर्तडक, पश्चिममधून सेनेचे सुधाकर बडगुजर व बळीराम ठाकरे यांच्याशिवाय दिंडोरीतील धनराज महाले, रामदास चारोस्कर, येवल्यातून माणिक शिंदे आदी दिग्गजांचा समावेश आहे. माघारीची मुदत अंतिम तीन वाजेपर्यंत असली तरी सर्वच पक्षांच्या वरिष्ठ स्तरावरील नेत्यांकडून बंडखोरांच्या माघारीसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, बंडखोरांनी मोबाईल फोन बंद करून ठेवल्याने नेत्यांची कोंडी झाली. त्यातच जे हाती लागले त्यांना घेऊन नेतेमंडळी अखेरच्या एक तासात माघारीसाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या दालनात पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागली. दरम्यान, माघारीनंतर उमेदवारांना लगेचच निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.

मतदारसंघनिहाय उमेदवारांची संख्या

नांदगाव : 15, मालेगाव मध्य : 13, मालेगाव बाह्य : 09, बागलाण : 06, कळवण : 06, चांदवड : 09, येवला : 08, सिन्नर : 09, निफाड : 06, दिंडोरी : 05, नाशिक पूर्व : 12, नाशिक मध्य : 10, नाशिक पश्चिम : 19, देवळाली : 12, इगतपुरी : 09.

72 अपक्ष रिंगणात

माघारीनंतर जिल्ह्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. 148 जण निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षाचे 53 उमेदवारांचा यात समावेश आहे. तसेच मान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षाचे 23 तर अपक्ष 72 उमेदवार नशिब आजमावत आहेत. सर्वाधिक 11 अपक्ष नाशिक पश्चिम व नांदगाव मतदारसंघात आहेत. तर विशेष म्हणजे दिंडोरीत एकही अपक्ष नाही.