घरमहाराष्ट्रकोकणात कमळाबाईक इचारता कोण...

कोकणात कमळाबाईक इचारता कोण…

Subscribe

पाच वर्षांपूर्वी भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न करून बघितले, पण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जे भाजपला जमले ते कोकणात मात्र बस्थान बसवणे अद्याप जमलेले नाही. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राजन तेली, संदेश पारकर, काका कुडाळकर हे आयात केलेले नेते आणि रवींद्र चव्हाण, प्रमोद जठार, अतुल काळसेकर, रवींद्र माने, विनय नातू हे पक्षातील सरदार सोबत असूनही भाजपला तीन जिल्ह्यात मिळून स्वतःचे असे अस्तित्व तरी करता आलेले नाही. एकूणच कोकणात भाजपचा जम बसत नसल्याचे पाहून मुख्यमंत्री अस्वस्थ आहेत. या अस्वस्थेपोटी देवेंद्र फडणवीस हे नारायण राणे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी तयार झाले आहेत.

युतीमधील मित्रपक्ष शिवसेनेची मोठी नाराजी ओढवून फडणवीस हे राणेंना भाजपच्या तंबूत आणत आहेत. मात्र राणेंना पक्षात आणणे म्हणजे तंबूपेक्षा उंट मोठा आणण्याचा प्रकार आहे. हा उंट मालकाने घातलेला चारापाणी खाऊन शांत बसणार्‍यातला नाही. तंबू छोटा आहे म्हणू तो मान खाली घालून बसणार नाही. मान वर करायची एकदा का त्याने ठरवले की तंबू फाडून तो बाहेर पडणारच. राणेंचा मूळ स्वभाव हा आक्रमक असून शिवसेना, काँग्रेसमध्ये असताना त्यांनी प्रसंगी नेतृत्वावरही हल्लाबोल करण्यास मागेपुढे पाहिलेले नाही. आता त्यांचे दिवस नाहीत आणि वेळकाळही साथ देत नसल्याने त्यांनी भाजपसमोर मान तुकवली आहे खरी, पण त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडल्या नाही तर ते मोदी आणि फडणवीस यांनाही सोडणार नाहीत.

- Advertisement -

राणे यांना भाजपमध्ये घेऊन (युती तुटल्यास) शिवसेनेला अंगावर घेता येईल,असे काही भाजपच्या मनात असल्यास त्याचा शेखचिल्ली होऊ शकतो. राणेंची ताकद ही सिंधुदुर्गपूर्ती मर्यादित आहे आणि आता तर ती कणकवली-वैभववाडीच्या सीमेबाहेर नाही. स्वत: राणे हे मागच्या विधानसभेत कुडाळमधून पराभूत झाले असून त्यांचे थोरले चिरंजीव निलेश राणेंना सलग दुसर्‍या वेळेस पराभवाला सामोरे जावे लागले आहे. युती तुटल्यास सिंधुदुर्गमधील विधानसभेचे तीन मतदारसंघ आणि रत्नागिरीतील सहा मतदारसंघ ताब्यात येतील, असे स्वप्न भाजप बघत असेल तर ते दिवास्वप्न ठरेल.

खुद्द सिंधुदुर्गमध्ये एक कणकवली-वैभववाडी मतदारसंघ शोधला तर राणे परिवाराचा स्वतःचा असा हमखास जिंकून येऊ शकतील, असा मतदारसंघ उरलेला नाही. वैभववाडी शेजारच्या राजापूरमध्ये त्यांची ताकद नाही, खाली रत्नागिरी आणि रायगडमधील जनाधार खूप दूरची गोष्ट आहे. इतके सारे दिसत असूनही भाजप भविष्यात राणेंच्या जोरावर भाजप उभा करू पाहत असेल तर पक्ष उभा करणे राहिले दूरच उलट राणे यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळलेले आणि कायम राणे यांचा विरोध करणार्‍या नेत्यांमध्ये बंडाळी होऊन भाजपची अवस्था आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी होईल.

- Advertisement -

समाजवादी कार्यकर्त्यांची जमिनीशी नाळ जोडली असल्याने जनता पक्ष कोकणात रुजला आणि प्रचंड निष्ठेपोटी कोकणातील जनतेने मधू दंडवते यांना पाचवेळा खासदार केले. १९९०च्या सुमारास शिवसेनेच्या वाघाने डरकाळी फोडल्यानंतर समाजवादी विचार मानसीच्या खाडीतून वेंगुर्ल्याच्या समुद्रात वाहून गेल्यानंतर सेना या भागात तळागाळात रुजली, त्याचे कारण होते ते म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे. आवाज कुणाचा, हा त्यांनी दिलेला आवाज आजही कोकणात घुमत असल्याने सेनेचा बालेकिल्ला अजून हललेला नाही. गावकुसातील मतदाराला उमेदवारापेक्षा ध नुष्यबाण महत्वाचा वाटतो आणि तो कसलीच अपेक्षा न करता गेली तीन दशके छाती पुढे करून ‘जय महाराष्ट्र’ करत आहे.

भाजपला याची पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात आला. मात्र एखाद्या पक्षाचा पाया तयार करणे वेगळे आणि सूज दाखवणे वेगळे ही गोष्ट चव्हाण यांच्या आता लक्षात आली असेल. मुख्यमंत्र्यांचा विश्वासू माणूस म्हणून कोकणच्या या तिन्ही जिल्ह्यात भाजपचा विस्तार करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मी स्वतः याचा साक्षीदार आहे. चव्हाणांकडे आलेला कार्यकर्ता कधी निराश होऊन गेलाय असे चित्र मी तरी कधी पाहिले नाही.

चव्हाण यांनी पेरलेले बी उगवायाला आणखी काही वर्षे लागतील. कोकणाच्या लाल मातीत देशी वाणाची बियाणे तग धरतात, तसे कृत्रिम बियाणे जोर धरू शकत नाहीत. रायगडात आज पनवेलची एक जागा सोडली तर ( काँग्रेस ते भाजप असा प्रवास करून आलेले प्रशांत ठाकूर) कोकणात भाजपची एकही जागा नाही. रायगडमध्ये पेण, अलिबाग शेकापकडे असून उरण, महाडमध्ये शिवसेना आणि कर्जतची जागा राष्ट्रवादीकडे आहे. रत्नागिरीत राजापूर, रत्नागिरी, दापोली, गुहागर, चिपळूण आणि श्रीवर्धनपैकी ३ ठिकाणी शिवसेना आणि २ जागांवर राष्ट्रवादी विजयी झालेली आहे. गंमत म्हणजे राष्ट्रवादीचे दोन आमदार भास्कर जाधव आणि अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सेनेची ताकद आणखी वाढली आहे. सिंधुदुर्गमध्ये तीनपैकी दोन ठिकाणी शिवसेना आहे.

पाच वर्षांनंतर या मतदारसंघामध्ये खूप काही बदल होऊन भाजपचा फयदा होईल असे चित्र आता तरी दिसत नाही. राणे यांना भाजपमध्ये घेतल्यास आणि युती तुटली तरी फार मोठी क्रांती होऊन सावत्र कमळ फुलेल या भ्रमविलासात भाजपने राहू नये. कारण सुरंगी, बकुळ जिथे फुलते तिथे कमळ उगवायला अजून विस्तीर्ण तळे येथे तयार झालेली नाहीत.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -