घरमुंबईप्रचारातच आशिष शेलारांचा झकेरियांनी काढला घाम

प्रचारातच आशिष शेलारांचा झकेरियांनी काढला घाम

Subscribe

वांद्रे पश्चिममध्ये भाजपचे आशिष शेलार यांचा विजय पक्का मानला जात असला तरी काँग्रेसचे आसिफ झकेरियांनी जोरदार आव्हान निर्माण केले आहे. झकेरिया यांच्याकडे सुरूवातीला दुर्लक्ष करणार्‍या शेलारांना आता प्रचारासाठी वणवण फिरावे लागत असून झकेरिया यांनी कडवे आव्हान निर्माण केल्यामुळे शेलार यांना धोका निर्माण झाल्याची चर्चा खुद्द भाजपातच सुरू आहे.

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातून भाजपचे विद्यमान आमदार आणि शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांचा विजय निश्चित मानला जातो. काँग्रेसने यावेळी माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्याऐवजी नगरसेवक आसिफ झकेरियांना यांना उमेदवारी दिल्यामुळे शेलार यांनी हा विजय पक्का मानला होता. त्यामुळे आपण केवळ अधिकाधिक मताधिक्य मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे शेलार यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत होते. परंतु आसिफ झकेरियांना या मतदार संघातून मुस्लीम समाजासह इतर समाजातील लोकांकडून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे शेलार यांनाही आता जोमाने प्रचार करावा लागत आहे.

- Advertisement -

या मतदार संघात आसिफ झकेरिया आणि एमआयएमचे राफत फरहत हुसेन दौलत हे दोघेच मुस्लीम मतदार असले तरी मुस्लिमांची मते मिळवणारा मुंबईतील आपण एकटेच आहोत,असे शेलार यांच्याकडून वारंवार सांगण्यात येते. परंतु या मतदार संघातील मुस्लिमांसह मतदानात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे एएलएम हे झकेरिया यांच्याबाजुने उभे राहिल्याने शेलार यांच्या उरात धडकी भरली आहे. या मतदार संघात भाजपचे तीन नगरसेवक असूनही शेलार यांच्या पराभवाचे रिपोर्ट आता बाहेर येवू लागले. पोलीस यंत्रणाही आता हा मतदार संघात धोका असल्याचे सांगत असल्याने शेलारांना आता पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.

मागील निवडणुकीत भाजप आमदार आशिष शेलार यांनी ७४, ७७९ मते मिळवली होती. तर काँग्रेसचे बाबा सिध्दीकी यांनी दुसर्‍या क्रमांकाची ४७,८६८ मते मिळवली होती. तर शिवसेनेचे विलास चावरी यांना १४, १५६ मते मिळाली होती. त्यामुळे मागील निवडणुकीचे मतदान पाहता शेलार हे सेफ झोनमध्ये असले तरी सर्व यंत्रणांचा अहवाल भाजप उमेदवाराविरोधात येत असल्याने खुद्द भाजपचे पदाधिकारीही चिंतेत आहेत. झकेरिया यांची मतदार संघातील ओळख आणि काम करण्याची पध्दत याचा विचार करता शेलारांच्या तुलनेत ते उजवे ठरत आहेत. त्यामुळे शेलार यांच्याऐवजी काँग्रेस म्हणून नव्हे तर आसिफ झकेरिया म्हणून त्यांच्याबाजूने जनता उभी राहताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -