घरमहाराष्ट्रनाराजीबद्दल विचारलं असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...!

नाराजीबद्दल विचारलं असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात…!

Subscribe

एकनाथ खडसे किंवा प्रकाश शेंडगे भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वावर अन्याय होत असल्याचं सांगत असतानाच चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे.

भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्वत:सहित पक्षातील इतरही काही मोठ्या नेत्यांवर गेल्या काही वर्षांमध्ये अन्याय झाल्याचा आरोप केला होता. विशेषत: विधानसभा निवडणुकांमध्ये तिकीट कापण्यावरून त्यांनी टीकेची तोफ डागली होती. यामध्ये त्यांचा प्रामुख्याने रोख हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याच दिशेने होता. मात्र, ज्या नेत्यांची नावं घेऊन खडसेंनी आरोप केले होते, तसेच, पूर्वाश्रमीचे भाजप आमदार आणि आत्ताची राष्ट्रवादीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी देखील ज्या नेत्यांवर भाजपने अन्याय केल्याचा आरोप केला, त्यापैकीच एक असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होत नाही’, असं ठाम वक्तव्य बावनकुळेंनी केलं आहे.

‘प्रकाश शेंडगेंना हे माहीत नसावं’

‘१९९२पासून मी भाजपचा कार्यकर्ता आहे. पक्षानं मला क्षमतेपेक्षा मोठं केलं आहे. महाराष्ट्रात ओबीसी नेतृत्वाला जितकं मोठं भाजपनं केलं, तेवढं कुणीही केलेलं नाही. पंकजा ताई, मी, परिणय फुके, संजय कुटे यांना भाजपनं मोठं केलं. ओबीसी मंत्रालय या राज्याला देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. प्रकाश शेंडगेंनी २०१४मध्ये भाजप सोडलंय. भाजपमध्ये ओबीसींपैकी कोण मोठं झालंय, तो प्रवास त्यांना माहीत नसावा’, असं बावनकुळे म्हणाले. दरम्यान, ‘माझं नाव घेऊन कोण काय बोलतं, हे मला माहीत नाही. पण माझ्या बाबतीत पक्षानं कोणताही अन्याय केलेला नाही. मी अजिबात नाराज नाही’, असं देखील बावनकुळेंनी सांगितलं.

- Advertisement -
हेही वाचा – पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पक्षातल्याच लोकांनी पाडले-एकनाथ खडसे

खडसे-शेंडगेंनी केला होता नाराजीचा दावा

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यंमत्रीपदावरून पायउतार व्हावं लागल्यानंतर एकनाथ खडसेंनी आपल्या नाराजीला मोकळी वाट करून दिली होती. ‘पक्षातल्या इतर ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन निवडणुका लढल्या असत्या, तर १५ ते २० जागा जास्त जिंकून आल्या असत्या’, असं खडसे म्हणाले होते. त्यात त्यांनी बावनकुळेंचं देखील नाव घेतलं होतं. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश शेंडगे यांनी देखील ‘भाजपनं बावनकुळेंचं तिकीट कापलं. ओबीसी नेत्यांवर भाजपमध्ये अन्याय होत आहे’, असं वक्तव्य केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळेंनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -