भाजपची ४ बंडखोरांवर कारवाई, पक्षातून केली हकालपट्टी

भाजपची ४ बंडखोर नेत्यांवर हकालपट्टीची कारवाई

Mumbai
bjp logo lotus
भाजप

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतरं झाल्याचं पाहायला मिळालं. ही पक्षांतरं जशी भाजप-शिवसेनेत झाली, तशीच ती काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये देखील झाली. यामध्ये आयारामांना तिकीट मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यमान आमदार आणि इच्छुक प्रतिनिधींमध्ये नाराजी दिसून आली. त्याच नाराजीमध्ये, अनेक इच्छुकांनी थेट बंडाचं निशाण फडकावत अपक्ष अर्ज दाखल करून स्वतंत्र झेंडा हातात घेतला. याचा सर्वाधिक फटका भाजप-शिवसेनेला बसत असून या पक्षांमधल्या अनेक इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. मात्र, आता महायुतीमधल्या बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बंडखोरी करणाऱ्या चार भाजप उमेदवारांवर पक्षातून हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.

हकालपट्टी करण्यात आलेले बंडखोर उमेदवार

  • चरण वाघमारे, तुमसर
  • गीता जैन, मीरा भाईंदर
  • बाळासाहेब ओव्हाळ, पिंपरी चिंचवड
  • दिलीप देशमुख, अहमदपूर, लातूर

याशिवाय भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांनी भाजपच्या जिल्हा सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे.

नरेंद्र पवारांबाबत अद्याप निर्णय नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या बंडखोरांना अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले होते. बंडखोरांनी माघार घेतली नाही तर त्यांना त्यांची जागा दाखविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, या इशार्याकडे साफ दुर्लक्ष करत बंडखोरांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. यापार्श्वभूमीवर भाजपने आज चार बंडखोरांवर कारवाई केली. मात्र, कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात लढणारे आमदार नरेंद्र पवार यांच्यावरील कारवाईबाबत भाजपने अजून निर्णय घेतलेला नाही.