घरमुंबई'अडीच वर्ष सडवली, आता शहाणे बना', भाजप नगरसेवकांची नाराजी!

‘अडीच वर्ष सडवली, आता शहाणे बना’, भाजप नगरसेवकांची नाराजी!

Subscribe

राज्यात शिवसेनेकडून भाजपची कोंडी केली जात असताना आता मुंबई महानगर पालिकेमध्ये भाजपनं विचार करून पुढच्या अडीच वर्षांचं धोरण ठरवावं, अशी भूमिका महापालिकेतल्या भाजप नगरसेवकांनी घेतली आहे.

मुंबई महापालिकेच्या २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेपेक्षा दोन नगरसेवक कमी असताना तसेच फोडाफोडीचे राजकारण करत महापालिकेवर भगवा फडकवण्याची पूर्ण संधी असतानाही भाजपने पहारेकर्‍याची भूमिका बजावत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. परंतु, तटस्थ राहत पहारेकर्‍याची भूमिका बजावण्याच्या पक्षाच्या या निर्णयामुळे भाजपच्या नगरसेवकांचे मोठे नुकसान झाले असून ‘अडीच वर्षे सडवली, आता पुढे तरी शहाणे बना’, अशा शब्दांतच भाजपच्या नगरसेवकांकडून वरिष्ठ नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली जाणार असल्याचे समजते. सत्तेच्या सारीपाटावर शिवसेनेकडून ज्या प्रकारे ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरु आहे, ते पहाता भाजपनेही महापौरपदासह प्रमुख वैधानिक आणि विशेष समित्यांचे अध्यक्षपद आपल्याकडे घ्यावे, अशी सूचना नगरसेवकांकडून केली जात आहे.

पहारेकरी की विरोधी पक्ष?

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे ८४ तर भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर शिवसेनेला तीन नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यानंतर हा आकडा ८७ वर पोहोचला होता. तर भाजपला दोन नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांचा आकडा ८४वर पोहोचला होता. राज्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता असल्याने, भाजपने त्यावेळी शिवसेनेला धक्का न देता मैत्री पाळली होती. त्यामुळे पुन्हा युतीत सत्तेवर न येता भाजपने बाहेरुन पाठिंबा देत एक प्रकारे पहारेकर्‍याची भूमिका निभावण्याचा निर्णय घेतला आणि निवडून आलेल्या नगरसेवकांना सत्तेपासून दूर ठेवले. परंतु पहारेकर्‍याची भूमिका बजावताना भाजपच्या नगरसेवकांना विरोधी पक्षाचीही भूमिका बजावता येत नसल्याने भाजपचे सर्व नगरसेवक प्रचंड नाराज आहे. ना सत्तेत, ना विरोधी पक्षात, मग नगरसेवकांनी काम कसे करायचे? असा सवाल करत भाजपच्या काही नगरसेवकांनी किमान आता महापालिकेत सत्ता स्थापन करावी किंवा पाठिंबा पूर्णपणे काढावा, अन्यथा युतीत सामील होऊन महापौर, उपमहापौर पदासह विविध समित्यांचे अध्यक्षपद घेतले जावे, असा सूर आळवण्यास सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

‘आता विचार करून ठरवा’

भाजपच्या मुंबईतील बहुतांशी नगरसेवकांनी आता शिवसेनेला जास्त मोकळीक देऊ नये, अशीच भावना व्यक्त केली आहे. राज्यात सत्ता स्थापताना युती असतानाही जर शिवसेना एवढी नाटके करत भाजपला अडचणीत पकडण्याच प्रयत्न करत असेल, तर त्यांना सर्व पदे बहाल करून आपल्या नगरसेवकांचे नुकसान का केले जाते? असाही सवाल केला आहे. मागील अडीच वर्षे तर आपल्या नगरसेवकांची सडली. पण पक्षाच्या वरिष्ठांनी विशेषत: मुंबई अध्यक्षांनी आता ठाम भूमिका घेत भाजपला महापालिकेत विविध पदे देण्याची मागणी करावी, अशीही सूचना केली जात आहे. तसेच जर आपल्याला शिवसेना पाठिंबा देणार नसेल तर पाठिंबा काढून भाजपने थेट विरोधी पक्षात बसावे, पण पहारेकरी म्हणून भूमिका यापुढे नसावी, अशीच भूमिका मांडली आहे.


हेही वाचा – मनसे-राष्ट्रवादीचे महापालिका निवडणुकीत नवे समीकरणं जुळणार?

भाजपचे गटनेते मनोज कोटक हे खासदार झाले असून त्यांच्या जागी अद्यापही गटनेत्याची निवड झालेली नाही. त्यामुळे कोटक यांच्याकडे गटनेतेपद कायम ठेवले तरी एक तर सत्तेत युती म्हणून नाहीतर विरोधी पक्ष म्हणूनच यापुढे काम केले जावे. परंतु शिवसेनेला आता सर्व सहज दिले जाऊ नये, अशी भूमिका काही नगरसेवक नाव न छापण्याच्या अटीवर मांडताना दिसत आहे. वरिष्ठ नेत्यांपर्यंत या भूमिका पोहोचवण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्यातील सत्तेचा निकाल काहीही लागो, पण मुंबई महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांना आता बदल हवा आहे, हे निश्चित. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आता भावनिक निर्णय न घेता भाजपच्या नगरसेवकांच्या पुढील अडीच वर्षांचा विचार करता निर्णय घ्यावा, अशीही सूचना नगरसेवकांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -