घरमुंबईचांदिवलीचा गड कोण राखणार?

चांदिवलीचा गड कोण राखणार?

Subscribe

नसीम खान यांची सत्ता खालसा करण्यासाठी लांडेंची जोरदार फिल्डींग

चांदिवली विधानसभा मतदार संघातून सलग दोनदा आमदार म्हणून निवडून आलेले काँग्रेसचे उमेदवार आरिफ नसीम खान यांना त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी शत्रू असलेले दिलीप (मामा) लांडे हे पूर्ण शक्तीनिशी निवडणूक रणांगणात उतरले आहेत. आजवर मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे दिलीप लांडे हे आता शिवसेनेच्या तिकीटावर लढत असून युतीचे उमेदवार असल्याने त्यांची ताकद अधिकच वाढली आहे. परंतु, लांडेची ही वाढलेली ताकद चांदिवलीतील नसिम खान यांची सत्ता खालसा करतील का असा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे.

कुर्ला विधानसभेतून सलग दोनदा आणि त्यानंतर चांदिवली विधानसभेतून सलग दोनदा अशाप्रकारे चारवेळा आमदार बनलेल्या काँग्रेस उमेदवार नसीम खान यांना यांच्यासह चांदिवली विधानसभा मतदार संघात २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यामध्ये १३ उमेदवार हे अपक्ष आहे. यामध्ये प्रमुख लढत ही नसीम खान विरुध्द दिलीप लांडे यांच्यात होणार आहे. परंतु, त्याबरोबरच मनसेचे सुमीत बारसकर, एमआयएमचे मोहम्मद कुरेशी, वंचितचे अब्दुल हसन खान,आम आदमीचे सिराजुद्दीन खान आदी उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत.

- Advertisement -

नसीम खान आणि दिलीप लांडे हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर, त्यांच्यासह मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे लांडे यांना शिवसेनेने चांदिवली मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. लांडे यांनी यापूर्वी २००९मध्ये मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवून नसीम खान यांना टक्कर दिली होती. त्यावेळी शिवसेनेच्या चित्रा सांगळे तिसर्‍या क्रमांकावर फेकल्या गेल्या होत्या. त्यानंतर मागील महापालिका निवडणुकीत लांडे यांच्याऐवजी मनसेने ईश्वर तायडे यांना उमेदवारी दिली होती. परंतु त्यावेळी तायडे तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते. परंतु या दोन्ही निवडणुकींमध्ये नसीम खान यांना मिळालेल्या मतांमध्ये केवळ ९ हजार मतांचा फरक पडला होता.

मोदी लाट असतानाही खान यांच्या मतांमध्ये कोणताही परिणामकारक बदल झालेला नाही. विशेष म्हणजे मनसेचे लांडे, तायडे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक अण्णामलई हे सर्व आता शिवसेनेत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपसह लांडे यांची वैयक्तिक मते तसेच अण्णामलई यांचे मतदार विचारात घेता नसीम खान यांच्यासाठी लांडे यांनी मोठे आव्हान तयार केले आहे. कोणत्याही परिस्थितीत नसीम खान यांचा पराभव करणारच अशी प्रतिज्ञा दिलीप लांडे यांनी केलेली आहे. नसीम खान हे केवळ आपल्या परंपरागत मतदारांवर अवलंबून असून जनता त्यांच्या पाठिशी असल्याने ते निवडून येतात. परंतु, यंदा कोणता करिष्मा घडवून शिवसेना हा गड काबिज करतो की नसीम खान तो गड राखण्यात यशस्वी ठरतात, मतपेटीतील मतदानातून स्पष्ट होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -