घरमहाराष्ट्रखडसेंच्या कन्येचा पराभव करणारे चंद्रकांत पाटील आहेत तरी कोण?

खडसेंच्या कन्येचा पराभव करणारे चंद्रकांत पाटील आहेत तरी कोण?

Subscribe

अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या विजयानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याशिवाय रोहिणी खडसे यांचा पराभव करणारे चंद्रकांत पाटील नेमके आहेत तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडत आहे

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा जळगावच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. गेल्या तीस वर्षांपासून एकनाथ खडसे या मतदारसंघातून निवडून येत होते. त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचार आणि इतर आरोपांमुळे यावेळी पक्षाने त्यांचे तिकीट कापले. पक्षाने त्यांच्या ऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, रोहिणी खडसे यांचा १९८७ मतांनी पराभव झाला आहे. अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा पराभव केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या विजयानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याशिवाय रोहिणी खडसे यांचा पराभव करणारे चंद्रकांत पाटील नेमके आहेत तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. दरम्यान, मुक्ताईनगरमध्ये मुलीच्या पराभवामुळे खडसेंची मोठी नाचक्की झाली आहे.


हेही वाचा – खडसेंना सर्वात मोठा धक्का; रोहिणी खडसे यांचा पराभव

- Advertisement -

कोण आहेत चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. ते शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर भाजप आणि शिवसेना यांच्या युतीबाबत साशंकता वर्तवली जात होती. दोन्ही पक्षांनी २८८ मतदारसंघामध्ये संभाव्य उमेदवाराला एबी फॉर्म दिल्याची चर्चा सुरु होती. मात्र, अखेर निवडणुकीच्या अवघ्या काही दिवसांअगोदर भाजप आणि सेनेने महायुतीची घोषणा केली. युतीच्या झालेल्या वाटाघाटीत मुक्ताईनगर मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला आला. त्यामुळे मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील नाराज झाले. त्यांनी बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अॅड. रवींद्रभैय्या पाटील आणि विनोद तराळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दर्शवला. चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले होते. मुक्ताईनगर मतदारसंघात सर्व पक्ष खडसेंच्या विरोधात एकवटले होते. मात्र, तरीही खडसेंनी एकेरी झुंज सुरु ठेवली. आपली कन्या जिंकून यावी यासाठी त्यांनी भरपूर प्रचार केला. मात्र, तरीही इतर पक्षांच्या ताकदीपुढे रोहिणी खडसे यांचा १९८७ मतांनी पराभव झाला.


हेही वाचा – अखेर मनसेचा गुलाल उधळला; कल्याणचे राजू पाटील विजयी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -