देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार!

विद्यमान विधानसभेचा कालावधी येत्या ९ नोव्हेंबर रोजी संपणार असल्यामुळे ८ नोव्हेंबरला दिवसअखेरपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यांच्या राजीनाम्यासोबतच राज्याच्या मंत्रिमंडळाचा देखील राजीनामा सादर होणार आहे.

devendra fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सत्तास्थापनेचा तिढा निकाल लागल्यानंतर चौदाव्या दिवशी देखील सुटू शकलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री कोण होणार? यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र, विद्यमान विधानसभेचा कालावधी येत्या ९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत असल्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी दिवसअखेरपर्यंत देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा देणं क्रमप्राप्त आहे. मात्र, असं असलं, तरी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा या पदावर भाजप दावा न करण्याच्या मन:स्थितीत असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर पुढचा मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार, याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळत आहे.

राज्यातल्या सत्तास्थापनेच्या गोंधळात गुरुवारचा दिवस सुद्धा नाट्यमय घडामोडींचा ठरला. एकीकडे भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली, तर मातोश्रीवर शिवसेनेच्या विजयी आमदारांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेना ५०-५० फॉर्म्युला आणि अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद या मागण्यांवर ठाम असल्याचा निर्णय करण्यात आल्याचं संजय राऊत यांनी दुपारी ‘सामना’च्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. तर तिकडे सुधीर मुनगंटीवार यांनी देखील राज्यपालांच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘पुढचा निर्णय आम्ही घेऊ’ असं सांगितलं. या पार्श्वभूमीवर आमदार फुटू नयेत, म्हणून शिवसेनेनं सर्व आमदारांची रवानगी रंगशारदा हॉटेलमध्ये केली आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांची भेट घेतली. अद्याप सत्तास्थापनेचा दावा कुणाकडूनही न आल्यामुळे संभाव्य परिस्थितीवर या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.


हेही वाचा – ‘…तर शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदही सोडलं असतं!’

तर फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री!

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची की मावळत्या मुख्यमंत्र्यांकडेच सरकार स्थापनेचा प्रस्ताव येईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी द्यायची? हा निर्णय आता राज्यपालांचा असणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा कालावधी संपला, तरीही त्यांच्याकडेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.