घरदेश-विदेशदिल्लीत ठरलं, गल्लीत वाटाघाटी

दिल्लीत ठरलं, गल्लीत वाटाघाटी

Subscribe

काँग्रेस-राष्ट्रवादीची सर्व मुद्यांवर चर्चा पूर्ण, आज शिवसेनेशी करणार चर्चा

राज्यात सत्तास्थापनेपर्यंत पोहचण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मागील चार दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठका गुरुवारी सकारात्मक निर्णयापर्यंत येऊन संपल्या आणि महाविकासआघाडीचे सरकार लवकरच दृष्टिपथात येण्याचे संकेत मिळत आहेत. यादरम्यान काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यास संमती दिल्यानंतर लागलीच दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सत्तेच्या वाटपासंबंधी अंतिम निर्णय घेण्यात आला. शिवसेनेसोबत सत्तास्थापन होणार्‍या सांभाव्य आघाडीचे ‘महाविकासआघाडी’ असे नामकरणही दिल्लीतच करण्यात आले. आता सत्तास्थापनेची पुढील प्रक्रिया आजपासून मुंबईत होणार आहे. शुक्रवारी पहिल्यांदा दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार, त्यानंतर सत्तेच्या वाटपाविषयी अधिक सुस्पष्टता येण्याची शक्यता आहे असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे राज्यात लवकरच तीन पक्षांचे सरकार येणार असून दिल्लीत ठरलेल्या सत्ता वाटपावर मुंबईत अंतिम मोहर लागणार आहे. शुक्रवारचा दिवस राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा असून उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘मातोश्री’ येथे सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत. दरम्यान, ‘सेक्युलर’ हा शब्द घटनेचा असून आम्हाला घटनेचा आदर आहे, असे वक्तव्य करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेविषयी हिंदुत्वाच्या भूमिकेवर होत असल्याचा चर्चांना उत्तर दिले, तर महाविकासआघाडीचे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळे ५ वर्षे चालेल, असा विश्वास रिपाइंचे अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
बुधवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ६ जनपथ येथील निवासस्थानी दिवसभर बैठकांचे सत्र झाल्यानंतर गुरुवारीही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका सुरू झाल्या. दोन किंवा अधिक पक्ष एकत्र येऊन निर्माण झालेल्या आघाडीला देशात नावे देण्याची पद्धत आहे. आतापर्यंत भाजप-शिवसेना आघाडीला युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडी असे नाव दिले गेले. शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत सामील होत असल्यामुळे या आघाडीला ‘महाशिवआघाडी’ असे नाव देण्यात येत होते.

- Advertisement -

मात्र आघाडीमध्ये शिवसेनेचा उल्लेख नको, अशी भूमिका काही काँग्रेस नेत्यांनी मांडली. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत इतरही छोट्या छोट्या पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांनाही आपलासा वाटेल असा ‘विकास’ हा शब्द महाआघाडीत समाविष्ट करण्याचा निर्णय झाला. शिवसेना प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करते, तर काँग्रेस धर्मनिरपेक्ष विचारांची आहे. त्यामुळे महाआघाडीच्या नावात शिवसेनेचा उल्लेख टाळून ‘महाविकासआघाडी’ असे नाव या नव्या आघाडीला देण्यात येणार आहे, असे माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

काँग्रेसची ‘मातोश्री’त स्वतंत्र बैठक
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशावरून काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल हे ‘मातोश्री’ येथे जाऊन स्वतंत्रपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.

- Advertisement -

शिवसेनेच्या बैठकीकडे लक्ष
राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी कालपर्यंत दोन्ही काँग्रेस नेत्यांच्याच बैठकांचे सत्र सुरु होते. शिवसेना मात्र दोन्ही काँग्रेसच्या अंतिम निर्णयाच्या प्रतिक्षेत होती. गुरुवारी दोन्ही काँग्रेसचे सेनेसोबत सत्तास्थापन करण्यावर एकमत झाल्यानंतर शुक्रवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांसोबत किमान समान कार्यक्रम तसेच सत्तेतील वाटपासंबंधी सविस्तर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी उद्धव ठाकरे हे मातोश्री येथे शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची सकाळी १० वाजता बैठक घेेणार आहेत. या बैठकीत सत्तेच्या वाटपाबाबत दोन्ही काँग्रेसमध्ये जे ठरले आहे त्याला कितपत सहमती द्यायची, तसेच सेनेने कोणत्या खात्यांचा आग्रह धरायचा, मुख्यमंत्री पद ५ वर्षांसाठी सेेनेकडेच असावे की ते विभागून घ्यायचे, अशा सत्तास्थापनेच्या प्रक्रियेतील सर्व मुद्यांवर अंतिम निर्णय होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -