हे तर बोलघेवड्यांचे सरकार – बाळासाहेब थोरात

पुण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर जोरदार टीका केली.

Pune
बाळासाहेब थोरात यांनी ही थोपटले दंड
बाळासाहेब थोरात यांनी ही थोपटले दंड

‘सांगली, कोल्हापूरला पूर आला त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील तिथे नव्हते. पुण्यातही पूर आला त्यावेळीही पालकमंत्री शहरात नव्हते. त्यामुळे व्यवस्थापनात अडचणी येउन मृतांची संख्या वाढली आणि नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले. पूरग्रस्तांचे पंचनामे अद्याप झाले नसून त्यांना नुकसान भरपाई देखील मिळालेली नाही. केंद्राकडून ६ हजार ८०० कोटी रुपयांचे पॅकेज आणणार अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, तरी त्यातील एक छदामही अद्याप मिळाला नाही. हे केवळ बोलघेवड्यांचे सरकार असून त्यांना जनतेशी देणेघेणे नाही’, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.

‘सरकार खोटं बोलतंय, पण रेटून बोलतंय’

काँग्रेस भवन येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते. ‘ओबीसी समाजासाठी सरकारने फार काम केले आहे, असे सांगणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ओबीसी समाजासाठी नेमके काय काम केले? हे जाहीर करावे. आरक्षणाच्या नावाखाली भाजपने सर्व समाजांची फसवणूक केली आहे. त्यांचे मित्र पक्षच त्याची जाहीर कबुली देत आहेत. विकास कामांच्या बाबतीतही केवळ खोटं बोल पण रेटून बोलणार्‍या सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे’, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशअध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.


हेही वाचा – ‘चंपा’ला पवार साहेबांशिवाय काही दिसत नाही-अजित पवार

‘स्मार्ट सिटीमध्ये सरकारने फसवलं’

‘या सरकारने धनगर समाजाचीही फसवणूक केली असून खुद्द रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी त्याची जाहीर कबुली दिली आहे. मात्र, त्यांना सत्ता सोडूशी वाटत नाही. विकास कामांमध्येही या शासनाने आश्‍वासने देऊन जनतेची फसवणूकच केली आहे. स्मार्ट सिटीसाठी केंद्राकडून २०१६ ते २०१८ मध्ये एकही पैसा मिळाला नाही. स्मार्ट सिटीमध्ये आज पदपथांवर वाहने धावताना पाहायला मिळत आहे. शहराचा शाश्‍वत विकास करण्यात भाजप अपयशी ठरली आहे’, असा आरोपही थोरात यांनी यावेळी केला.