घरमुंबईधानुरकरांच्या प्रवेशामुळे दादरमध्ये मनसेची डोकेदुखी वाढली

धानुरकरांच्या प्रवेशामुळे दादरमध्ये मनसेची डोकेदुखी वाढली

Subscribe

शिवसेनेच्या सदा सरवणकरांना होणार मदत

मनसेचे माजी शाखाप्रमुख तसेच स्वीकृत नगरसेवक गिरीष धानुरकर यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. धानुरकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे दादर-माहिमचे शिवसेना उमेदवार सदा सरवणकर यांची ताकद वाढली असून मनसेचे संदीप देशपांडे यांची डोकेदुखी वाढली आहे. मागील महापालिका निवडणुकीपासून गिरीष धानुरकर हे मनसेपासून दूर होते. परंतु दादरमधील मनसेचे पदाधिकारी त्यांच्या संपर्कात असल्यामुळे संदीप देशपांडे यांच्यासाठी धोक्याची सूचना मानली आहे.

विधानसभा मतदार संघाचा प्रचार शनिवारी संपण्यापूर्वीच दादर-माहिम विधानसभा मतदार संघातील मनसेचे पदाधिकारी गिरीष धानुरकर यांचा शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. शुक्रवारी रात्री त्यांनी मातोश्रीवर प्रवेश देत त्यांच्या हाती शिवबंधन बांधण्यात आले असून त्यांची वर्णी उपविभागप्रमुखपदी करण्यात आली आहे. धानुरकर हे मनसेच्या स्थापनेनंतर काळात दादरमधील मनसेचा चेहरा तसेच पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. २०१२च्या महापालिका निवडणुकीत त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी बंडाचे निशाण रोवले होते.

- Advertisement -

पण त्यानंतर राज ठाकरेंनी त्यांची समजूत काढून त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर २०१७च्या निवडणुकीतही धानुरकर यांना तिकीट नाकारण्यात आल्यामुळे ते मनसेपासून अलिप्त होते. २०१२मध्येही शिवसेनेने त्यांना विचारले होते. परंतु, त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या प्रस्तावावर उत्तर दिले नव्हते. परंतु, या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षात घेवून त्यांच्यावरच उपविभागप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी मनसेचे प्रकाश पाटणकर हे शिवसेनेत आले होते. त्यामुळे एकप्रकारे दादरमध्ये मनसेचे पदाधिकारी नाराज असून अजुनही काही शिवसेनेत परतण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -