घरमुंबईबंडखोरांमुळे दहा मतदार संघात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना धोका

बंडखोरांमुळे दहा मतदार संघात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना धोका

Subscribe

महापौर महाडेश्वरांसह सात विद्यमान आमदारांच्या तोंडाला फेस

मुंबईत शिवसेना आणि भाजपच्या बंडखोरांमुळे प्रस्थापित आमदारांची डोकेदुखी वाढली आहे. एकूण चार प्रमुख मतदार संघांमध्ये बंडखोरी झालेली असून या बंडखोरांना त्यांच्या पक्षातून अंतर्गत मदत केली जात आहे. याशिवाय कल्याण, उरण, बोईसर, मिरारोड, श्रीवर्धन आदी मतदार संघांमुळे बंडखोरांची ताकद अधिक वाढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुंबईचे महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांच्याबरोबरच सात विद्यमान आमदारांच्या तोंडाला या बंडखोरांनी फेस आणला आहे.

वर्सोवा विधानसभा मतदार संघाची जागा भाजपने शिवसंग्रामला सोडून त्याठिकाणी विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेनाविरोधी असलेल्या लव्हेकर यांच्याविरोधात शिवसेनेच्या महिला विभाग संघटक राजुल पटेल निवडणूक रिंगणात उतरल्या आहे. लव्हेकर यांचे चिन्ह कमळ असले तरी राजुल पटेल यांची रिक्षाचे चिन्ह आता घराघरांत पोहोचले आहे. मात्र,बंडखोरी करूनही शिवसेनेने राजुल पटेल यांना पक्षातून न काढता, त्यांच्या पाठिशी शिवसेनेची एक फौज तयार केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अपक्ष उमेदवार राजुल पटेल यांनी प्रचारात घेतलेली बाजी पाहता लव्हेकर यांच्यासह काँग्रेसचे बलदेव खोसा यांच्या नाकीदम आला आहे.

- Advertisement -

वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघात शिवसेनेने विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांचा पत्ता कापून महापौर प्रि.विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तृप्ती सावंत यांनी अपक्ष उमदेवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरत बंडखोरी केली आहे. मात्र पहिल्या टप्प्यात सावंत यांची पक्षातून हकालपट्टी न करणार्‍या शिवसेनेने दुसर्‍या टप्प्यात त्यांची हकालपट्टी केली. या हकालपट्टीमुळे सावंत यांच्या पाठिमागे सहानभूतीची एक लाट निर्माण होत आहे.या मतदार संघातून काँग्रेसचे झिशान सिद्दीकी आणि मनसेचे अखिल चित्रे हे निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, त्यातही हाती बॅट घेत सावंत यांनी जोरदार बॅटींग केल्यामुळे एक वेगळेच चित्र निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे. सहानुभूतीच्या लाटेत शिवसेनेच्या मतांची विभागणी झाल्यास सावंत यांच्या विजयाचा मार्ग दूर नाही,असेही बोलले जात आहे. त्यामुळे महाडेश्वर यांची धाकधुक मात्र वाढलेली आहे.

घाटकोपर पश्चिम मतदार संघातील विद्यमान आमदार राम कदम हे महायुतीचे उमेदवार असले तरी मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेविका डॉ. अर्चना भालेराव यांचे पती माजी नगरसेवक संजय भालेराव यांनी बंडखोरी केलेली आहे. आमदार म्हणून राम कदम यांनी शिवसेनेच्या विरोधात केलेल्या कामांमुळे शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे शिवसेनेचे संजय भालेराव यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे भालेराव यांच्या शिट्टीचा आवाज घाटकोपरमध्ये असून शिवसेनेनेही त्यांना पक्षातून काढून न टाकता एकप्रकारे त्यांना अंतर्गत पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे राम कदम यांच्याविरोधातील भालेराव यांच्या पथ्यावर पडल्यास त्यांच्या विजयाला सुरुंग लागण्याची भीती वर्तवली जात आहे.

- Advertisement -

अंधेरी पूर्व भागातील महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार रमेश लटके हे निवडणूक लढवत असले तरी भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मुरजी आणि केशरबेन पटेल हे दोघेही नगरसेवक म्हणून निवडून आले होते. परंतु जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद बाद झाले. परंतु मुरजी पटेल यांना पक्षातूनही पाठिंबा असला तरी पक्षातच त्यांचे दोन गट निर्माण झाल्याने त्यांच्याबाजुने किती मतदान फिरेल,असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लटकेही काहीसे चिंतेत असल्याने त्यांनाही आता जोर लावावा लागला आहे.

कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्व मध्ये अनुक्रमे भाजपचे नरेंद्र पवार आणि शिवसेनेचे नगरसेवक धनंजय बोडारे हे अपक्ष म्हणून शिवसेना आणि भाजप उमेदवारांविरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे कल्याण पश्चिम मध्ये शिट्टी आणि कल्याण पूर्व मध्ये संगणक कुणाची वाट लावणार हे २४ तारखेलाच स्पष्ट होईल. तर उरणमध्ये शिवसेनेचे मनोहर भोईर यांच्याविरोधात भाजपचे महेश बालदी हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. बालदी यांना पक्षाचा अंतर्गत पाठिंबा असल्याने शिवसेनेचे मनोहर भोईर यांच्यासाठी ही निवडणूक जड मानली जात आहे. तर श्रीवर्धनमधून राष्ट्वादी काँग्रेसच्या अदिती तटकरे निवडणूक लढवत असल्याने काँग्रेसचे ज्ञानदेव पवार यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून लढत देत आहेत. त्यामुळे तटकरेंना शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांच्यासह बंडखोर ज्ञानदेव पवार यांचेही आव्हान आहे.

मिरारोडला भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांना त्यांच्या पक्षाच्या आणि मिरा रोडच्या माजी महापौर गीता जैन यांनी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे याठिकाणी भाजप विरुध्द भाजप अशी लढत पहायला मिळत आहे. परंतु गिता जैन यांना पक्षाने काढून टाकल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची आहे. तर बोईसरमध्ये बविआला सोडून शिवसेनेत आलेले माजी आमदार विलास तरे यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष जनाटे यांनीच बंडखोरी करत आव्हान दिले आहे. जनाटे यांच्या मागे भाजप उभी राहिल्याने तरे यांच्यासाठी ही निवडणूक जड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बंडखोरांची लढत कुणाशी
वर्सोवा : राजुल पटेल(शिवसेना) विरुध्द भाजपच्या भारती लव्हेकर,काँग्रेसचे बलदेव खोसा
वांद्रे पूर्व : तृप्ती सावंत (शिवसेना)विरुध्द शिवसेना विश्वनाथ महाडेश्वर, काँग्रेस झिशान सिध्दीकी, मनसेचे अखिल चित्रे
घाटकोपर पश्चिम: संजय भालेराव(शिवसेना) विरुध्द भाजपचे राम कदम
अंधेरी पूर्व: मुरजी पटेल (भाजप)विरुध्द शिवसेनेचे रमेश लटके,काँग्रेसचे जगदीश अमिन कुट्टी
उरण : महेश बालदी(भाजप) विरुध्द शिवसेनामनोहर भोईर, शेकापचे विवेक पाटील
श्रीवर्धन : ज्ञानदेव पवार (काँग्रेस)विरुध्द राष्ट्वादीचे अदिती तटकरे, शिवसेनेचे विनोद घोसाळकर
कल्याण पश्चिम : नरेंद्र पवार (भाजप)विरुध्द शिवसेनेचे विश्वनाथ भोईर
कल्याण पूर्व : धनंजय बोडारे (शिवसेना)विरुध्द भाजपचे गणपत पाटील
बोईसर : संतोष जनाटे (भाजप)विरुध्द शिवसेनेचे विलास तरे
मिरा रोड : गिता जैन(भाजप) विरुध्द भाजपचे नरेंद्र मेहता, काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -