घरमहाराष्ट्रसांगोल्यात गणपतराव देशमुखांचे नातू निवडणूक रिंगणात

सांगोल्यात गणपतराव देशमुखांचे नातू निवडणूक रिंगणात

Subscribe

सांगोला मतदारसंघातून अखेर डॉ. अनिकेत देशमुख निवडणूक लढवणार आहे. अनिकेत हे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. गणपतराव देशमुख यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाने भाऊसाहेब रुपनर यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला.

सांगोला मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. मागील ५५ वर्षे गणपतराव देशमुख या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. सध्या गणपतराव देशमुख यांचे वय ९४ असून प्रकती आणि वयाच्या कारणांमुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शेकापने गणपतराव देशमुख यांच्याऐवजी मुलाखती घेऊन उद्योजक भाऊसाहेब रुपनर यांची उमेदवारी जाहीर केली. रुपनर हे गणपतराव देशमुख यांचे निकटवर्तीय समजले जातात. स्थानिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला केला होता.अखेर शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाने रुपनर यांची उमेदवारी रद्द करून डॉ. अनिकेत देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली.

- Advertisement -

शुक्रवारी सकाळी अनिकेत यांनी आजोबा गणपतराव देशमुख यांचे आशिर्वाद घेतल्यानंतर निवडणूक अर्ज दाखल केला. यावेळी अनिकेत यांचे वडील आणि गणपतराव देशमुख यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह आघाडीतील नेते उपस्थित होते. अनिकेत आपला राजकीय वारसा समर्थपणे चालवतील असा विश्वास गणपतराव देशमुख यांनी सांगितले. शेकापचे उमेदवार अनिकेत यांना विजयी करून विधानसभेत सर्वात तरूण आमदार सांगोल्यातून पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले.

शेकापचे उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख सध्या वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. सर्व शेकाप नेत्यांनी आपल्यावर दिलेली जबाबदारी आपण आनंदाने पार पाडू असे डॉ अनिकेत देशमुख यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -