Sunday, August 9, 2020
Mumbai
28.5 C
घर महाराष्ट्र BREAKING : राज्यपालांचं भाजपला सत्तास्थापनेचं आमंत्रण

BREAKING : राज्यपालांचं भाजपला सत्तास्थापनेचं आमंत्रण

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अखेर भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे आता पुढची गणितं भाजप कसं जुळवणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Mumbai
Devendra Fadnavis
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेच प्रसंगावर अखेर राज्यपालांनी तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नियमाप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपला सत्तास्थापनेसाठी संख्याबळ सिद्ध करावं लागणार आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी आघाडी अस्तित्वात येण्याची शक्याता वर्तवली जात होती. मात्र, राज्यपालांनी पहिल्यांदा भाजपला निमंत्रण दिलं. जर भाजप संख्याबळ सिद्ध करण्यात अपयशी ठरला, तर इतर पक्षांचा राज्यपाल विचार करू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्याच नेतृत्वात सरकार स्थापन होणार असल्याचा पुनरुच्चार केला होता. अखेर भाजपलाच राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. दरम्यान, ‘रविवारी होणाऱ्या कोअर टीमच्या बैठकीमध्ये बहुमताचा आकडा कसा जुळवायचा? याविषयी चर्चा होणार’ असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

आकड्यांची जुळवाजुळव कशी करणार?

२४ ऑक्टोबर रोजी निकाल लागल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीला मतदारांनी बहुमत दिलं होतं. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून या दोन्ही मित्रपक्षांमध्ये सुरू झालेली सुंदोपसुंदी अद्याप शमण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं. शिवाय, दोघांनी देखील एकमेकांसोबत न आल्यास इतर पर्यायांच्या मदतीने सरकार स्थापन करण्यात येईल असा दावा देखील करण्यात आला होता. त्यामुळे आता भाजप बहुमतासाठी आवश्यक असलेल्या पुरेशा संख्याबळाचा आकडा कसा गाठणार? हा प्रश्न भाजपच्या धुरिणांना सतावणार आहे.


हेही वाचा – आता भाजपचं सरकार येणार नाही, पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान!

९ नोव्हेंबर म्हणजे आजच विद्यमान विधानसभेची मुदत संपत असल्यामुळे राज्यपालांना यासंदर्भात आजच निर्णय घेणं क्रमप्राप्त होतं. त्यानुसार राज्यपालांनी भाजपला आमंत्रण दिलं आहे. मात्र, आता बहुमत सिद्ध करेपर्यंत भाजपला वेळ मिळाला असून त्यादरम्यान शिवसेनेची मनधरणी करण्यात यश मिळवण्याचा प्रयत्न भाजप करण्याची शक्यता आहे.