घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील सहा कॅबिनेट मंत्री

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील सहा कॅबिनेट मंत्री

Subscribe

महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या मंत्रीमंडळातील सहा मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँगे्रेसचे विधीमंडळ नेते जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात आणि ज्येष्ठ नेते नितिन राऊत यांचा सामावेश होता.

‘मास बेस’ असलेला नेता

Eknath-Shinde
एकनाथ शिंदे

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मानाचे पान असलेला शिवसैनिक म्हणजे एकनाथ शिंदे होय. कडवट शिवसैनिक, जोडतोडीच्या राजकारणाचे कौशल्य या एकनाथ शिंदे यांची जमेची बाजू आहे. 2014च्या मोदी लाटेतही शिंदेंनी ठाण्यात शिवसेनेची पडझड होऊ दिली नाही. कार्यकर्त्यांचे गार्‍हाणे ऐकून घेण्याची क्षमता आणि ‘मास बेस’ असलेला नेता म्हणून शिंदेची ओळख आहे. आनंदराव दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना टिकवण्यामागे शिंदेंचे योगदान मोठे आहे. ते दहावी उत्तीर्ण आहेत.

- Advertisement -

शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेला नेता

subhash-desai_sivsena
सुभाष देसाई

सुभाष देसाई हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सर्वात जवळच्या नेत्यांमधले नेते मानले जातात. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेला नेता ही देसाईंची जमेची बाजू आहे. शिवाय बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेनेला सावरण्यात उद्धव ठाकरे यांना ज्यांचा मोठा आधार मिळाला, त्यात देसाईंचे नाव सर्वात आघाडीवर आहे. सुभाष देसाई यांचेही शिक्षण दहावी उत्तीर्ण असे आहे.

काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे विश्वासू

balasaheb thorat
बाळासाहेब थोरात

महाविकासआघाडीची मोट बांधण्यामध्ये बाळासाहेब थोरात यांची मोठी भूमिका राहिली आहे. दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींना राजी करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे ते विश्वासू मानले जातात. अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये महसूलमंत्रीपद भूषवले होते.

- Advertisement -
छगन भुजबळ

शरद पवार यांचे विश्वासू

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू मानले जातात. त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाचीही धुरा सांभाळलेली आहे. अशोक चव्हाण सरकारमध्ये त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री पद भूषवले होते. विशेष म्हणजे त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतूनच झाली. ते १९७३ साली मुंबई महानगरपालिकेत निवडून गेले होते. त्यांनी मॅकॅनिकल इंजिनियरिंगचा डिप्लोमा घेतला आहे.

NCP MLA Jayant Patil
जयंत पाटील

 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बहुविध भूमिका बजावणारे

पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे एकनिष्ठ तर अजित पवार यांचे विश्वासू, पवार घराण्याशी जवळीकता तर संघटनेत शब्दाला मान, अशी बहुविध भूमिका जयंत पाटील पार पाडतात. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2014 पूर्वी पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात ते ग्रामविकास मंत्री होते. राजारामबापू पाटील यांचे चिरंजीव असलेल्या जयंत पाटील यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले. राजारामबापू काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी सिव्हील इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.

nitin raut
डॉ. नितीन राऊत

विदर्भाचा काँग्रेसचा चेहरा

डॉ. नितीन राऊत हे महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आहेत. राऊत 2014 पर्यंत महाराष्ट्र सरकारमध्ये रोजगार हमी आणि जलसंधारण विभागाचे कॅबिनेट मंत्री होते. 1999, 2004 आणि 2009 मधील विधानसभा निवडणुकीत ते नागपूर उत्तर मतदारसंघातून आमदारपदी निवडून गेले होते. त्यांनी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय, गृह, जेल, राज्य कामगार आणि उत्पादन शुल्क विभागाचे कॅबिनेट मंत्रिपद भूषवलेआहे. एम.ए. पी.एच.डी असे त्यांचे शिक्षण आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -