घरमहाराष्ट्रचर्चा पूर्ण झाल्याशिवाय आघाडीची घोषणा होणार नाही - जयंत पाटील

चर्चा पूर्ण झाल्याशिवाय आघाडीची घोषणा होणार नाही – जयंत पाटील

Subscribe

‘आघाडीची चर्चा पूर्ण झाल्याशिवाय आघाडी जाहीर करता येणार नाही. राष्ट्रवादीची अंतर्गत बैठक होईल, त्यानंतर अंतिम यादी जाहीर करण्याचा निर्णय घेऊ. आघाडीचा निर्णय झाल्यानंतर आम्ही यादी जाहीर करण्याचा निर्णय घेणार आहोत’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष यांच्याकडून अद्यापही अधिकृत आघाडीची घोषणा झालेली नाही. दरम्यान, जागा वाटपासंदर्भात दोन्ही पक्षांची रविवारी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यात आली. मात्र, या बैठकीत सर्वच जागांचा तिढा सूटलेला नाही. अजूनही ८ ते १० जागांबाबत निर्णय घेतला गेला नसल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. याशिवाय जागा वाटपासंदर्भात २ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा होईल, असेही के म्हणाले.

मित्र पक्षांसाठी आघाडी किती जागा सोडणार?

राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीत मित्र पक्षांना किती जागा मिळतील याबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही. जयंत पाटील यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘मित्र पक्षांच्या बाबतीत साधक बाधक चर्चा झाली आहे. किती जागा मित्र पक्षांना द्यायच्या यांची चर्चाही लवकर पूर्ण होईल’. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या आखाड्यात राष्ट्रवादी की काँग्रेस पक्ष उतरणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. ‘पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी आमचे बोलणे झाले. पण ते विधानसभा निवडणूक लढायला इच्छुक आहेत. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी मिळून तिथे कोण उभा राहणार? याची चर्चा होऊन लवकरच उद्या दुपारपर्यंत हा निर्णय घेऊ’, असे जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

‘नारायण राणे यांच्याबाबत वाईट वाटते’

नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता त्यांनी नारायण राणे यांना भाजपकडून मिळणाऱ्या वागणुकीबाबत आपल्याला वाईट वाटत असल्याचे सांगितले. ‘नारायण राणे सारखे स्वाभिमानी नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पण त्यांच्या भाजप प्रवेशावर अजूनही प्रश्नचिन्ह आहेत. कारण ज्याप्रकारे माजी मुख्यमंत्री असलेल्या नेत्याला भाजप अशी वागणूक देते याचे वाईट वाटते’, असे जयंत पाटील म्हणाले.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -