घरमहाराष्ट्रमहाडमध्ये युती आणि आघाडीची चढाओढ !

महाडमध्ये युती आणि आघाडीची चढाओढ !

Subscribe

जसजशी मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे तसतशी राजकीय रंगत वाढत आहे. महाड विधानसभा मतदारसंघात आपली सत्ता टिकवण्यासाठी युतीचे आणि सत्ता काबीज करण्यासाठी आघाडीचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या मतदारसंघात 8 उमेदवार रिंगणात असले तरी शिवसेना आणि काँग्रेस या दोनच पक्षांच्या उमेदवारांमध्ये चुरस सुरू आहे. या दोन्ही उमेदवारांची विजयाची धुरा मात्र मित्र पक्षांवर आहे. शिवसेना या मतदारसंघात भाजप आणि रिपब्लिकन पार्टीला सोबत घेऊन आहे, तर काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

माणिक जगताप यांनी २००४ मध्ये प्रभाकर मोरे यांचा पराभव केला. त्यानंतर जगताप यांना मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे भरत गोगावले यांच्याकडून १४ हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. २०१४ मध्ये देखील जगताप यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी त्यांचा २१ हजारांच्या फरकाने पराभव झाला. या दोन्ही वेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे स्वतंत्र उमेदवार उभे होते, तर शिवसेना आणि भाजप हे युतीत असले तरी भाजपचा प्रभाव या मतदारसंघात फार कमी राहिला आहे. यावेळी मात्र उलट स्थिती असून, दोन्ही उमेदवार हे मित्र पक्षांवर अवलंबून आहेत. राज्यात भाजपचा जोर असल्याने महाडमध्येदेखील मधल्या काळात काहीजण भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

- Advertisement -

आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्त्वाखाली या ठिकाणी भाजप वाढीचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेतून भाजपमध्ये बिपीन म्हामुणकर, जयवंत दळवी असे प्रमुख कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्याने शिवसेनेचे लक्ष भाजपच्या मदतीकडे लागले आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या कार्यकारिणीमुळे जुने कार्यकर्ते नाराज आहेत. ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली जात नसली तरी या नाराजीचा फायदा आणि तोटा कोणाला होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातच शिवसेना उमेदवार गोगावले यांनी अर्ज दाखल करताना भाजप नेते उपस्थित नसल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र या चर्चेला भाजप नेत्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेत पूर्णविराम दिला. एकीकडे रिपब्लिकन पार्टीच्या तालुकाध्यक्षांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर जात काँग्रेसला पाठिंबा देण्याचे जाहीर केल्याने शिवसेनच्या गोटात चिंता वाढली आहे.

मित्र पक्षांच्या या चर्चेत राष्ट्रवादीचादेखील सहभाग झाला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना निवडून आणण्यासाठी आघाडीचा धर्म पाळत जगताप यांनी महाड आणि पोलादपूरमध्ये विशेष मेहनत घेतली. यावेळी आपल्या जाहीर सभांतून तटकरे यांनी पुढचे आमदार जगताप असतील असे ठामपणे सांगितले. परंतु काँग्रेसमधून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या काहींना काही बाबी खटकल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादीच्या मदतीबाबत चर्चांना उधाण आले. याला उत्तर देण्यासाठी तटकरे यांनी जगताप यांच्या अर्ज दाखल करण्याच्या दिवशी जातीने हजर राहत शुभेच्छा दिल्या. शिवाय प्रचारात आघाडी घेतली. महाडमध्ये शेकापने प्रचाराकरिता विशेष सहभाग घेतला आहे. शिवसेना आणि भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये मित्र पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. येथील उमेदवारांच्या विजयाची धुरा याच मित्र पक्षांवर असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -