Tuesday, January 19, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र महाराष्ट्रात पुन्हा युतीला स्पष्ट बहुमत

महाराष्ट्रात पुन्हा युतीला स्पष्ट बहुमत

Related Story

- Advertisement -

मुंबईत बॉम्बस्फोट करणार्‍यांशी विरोधक व्यापार करतायेत! –मोदींचा घणाघात 

मुंबईत जेव्हा जेव्हा दहशतवादी हल्ले झाले, बॉम्बस्फोट झाले तेव्हा त्यांची जबाबदार घेणार्‍या दहशतवाद्यांची काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते पाठराखण करायचे. या करताच त्यांनी ७० वर्षे कलम ३७० पाळले होते. त्यामुळे दहशतवाद्यांची निर्मिती होत गेली. मात्र आम्ही ३७० कलम हटवले. १९९३ मधील बॉम्बस्फोट मुंबई, महाराष्ट्र आणि देश कधीच विसरू शकत नाही. त्यामध्ये ठार झालेल्यांना तेव्हाच्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने न्याय दिला नाही. ज्यांनी हे कृत्य केले ते देश सोडून पळून गेले. आता त्यांच्याशी हे मिर्चीचा व्यापार करत आहेत. कुणी मिर्चीवाल्यांशी व्यापार करत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्ची यांच्याशी व्यापारी संबंध असल्याच्या आरोपाखाली सुरू असलेल्या चौकशीवरून घणाघाती हल्ला केला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बीकेसी येथे भाजप, शिवसेना, रिपाइं या महायुतीची प्रचारसभा पार पडली, त्यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या काळात मुंबईत केव्हाही दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट व्हायचे. आमच्या कार्यकाळात तेच दहशतवादी घाबरत आहेत. सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट हे उत्तर त्यांच्याकरता पुरेसे आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

- Advertisement -

मुंबई ही उत्तम मानवी संपत्तीची, मजबूत अर्थकारणाची आणि इनोव्हेटीव्ह व्हेंचर कॅपिटल यांची राजधानी आहे. अशा मुंबईला या तीनही सूत्रांमध्ये बांधण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश मिळाले आहे. मागील सरकारच्या काळात राज्याच्या विकासाऐवजी मंत्रालयाच्या इन्फास्ट्रक्चरवर लक्ष असायचे. कोणते मंत्री येणार, कोण मुख्यमंत्री होणार यातच त्यांची ५ वर्षे निघून जायची; परंतु पहिल्यांदा महायुतीच्या सरकारने राज्याच्या ५० वर्षांच्या कार्यकाळात सलग ५ वर्षे आपल्यापदी कायम असलेला मुख्यमंत्री दिला. जनतेने मजबूत सरकार निवडून दिले म्हणून हे शक्य झाले आहे. तुम्ही बेभरवशाचे सरकार बघितले आहे आणि आता भरवशाचेही सरकार अनुभवले आहे. मागील सरकारने सैनिकांच्याही वाट्याचे पैसे लुटले. भ्रष्टाचार्‍यांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी प्रयत्न केले. सिंचनाच्या नावाखाली घोटाळे केले. याउलट आमचे केंद्र असो की राज्य सरकार, ५ वर्षांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचा एक डाग लागला नाही. सर्व सेवा ऑनलाइन केल्यामुळे भ्रष्टाचार घटत चालला आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

आघाडी सरकारने मुंबईत ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबईतील विमानतळ, मुंबई मेट्रो इत्यादी प्रकल्प बासनात बांधून ठेवले होते. आम्ही त्यांच्या फाईल बाहेर काढून ते पुर्णत्वास नेत आहोत. आघाडी सरकारच्या कार्यकाळातील विकासाची गती पाहून कासवालाही लाज वाटेल. आमच्यासाठी पक्षापेक्षा देश मोठा आहे. राजकारण आमच्यासाठी राष्ट्रसेवा करण्याचे माध्यम आहे. भाजप पक्षाची मुंबईशी नाळ जोडलेली आहे, पक्षाचा जन्मच इथे झाला असल्याने मुंबई, महाराष्ट्रातील जनतेची सेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. त्याकरता भरभरून मतदान करा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

- Advertisement -

साफसफाई सुरूच राहणार !
काँग्रेसच्या काळातील सरकार जनतेला आश्रित बनवण्याचा प्रयत्न करत असे. याउलट आम्ही जनतेसाठी सेवक भावाने काम करत आहोत. पक्की घरे, वीज, पाणी, शौचालय, गॅस कनेक्शन, ५ लाख रुपयांचा मोफत औषधोपचार अशा अनेक योजना दिल्या. गरिबीच्या लढाईच्या विरोधात आम्ही रोजगार निर्मिती करणार्‍यांचा सन्मान करत आहोत. रोजगार निर्माण करणार्‍यांना आम्ही कर सवलत देत आहोत. याउलट तत्कालिन आघाडी सरकारने १० वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्था, बँकींग व्यवस्थेला बरबाद केले, त्यातील आता कुणी तिहारमध्ये तर कुणी मुंबईतील जेलमध्ये आहेत. ही साफसफाई अशीच जोरात सुरू राहणार आहे. इमानदारावर अन्याय होणार नाही आणि बेईमानावर कारवाई होणार आहे. आम्ही जो संकल्प करतो तो पूर्ण होईपर्यंत थांबत नाही आणि कुणासमोर झुकतही नाही, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

आम्हाला ईडीची गरज नाही । – मुख्यमंत्री
‘आम्ही लहान लोकांशी लढत नाही. आम्ही लहान मुलांशी लढत नाही. खरे आहे पवार साहेब! आम्ही लहान आहोत. पण एक गोष्ट तुम्हाला विचारतो. पाच वर्षे पदोपदी तुम्ही आमच्याशी सामना केलात. आम्ही तुमच्याशी लढलो. मात्र, या लहान मुलांनीच तुमच्या पक्षाला चारीमुंड्या चित्त केले आहे. काही लोक नख कापून जखमी झाल्याचा आव आणतात. नख कापून शहीद झाल्याचा आव आणतात आणि म्हणतात आम्ही ईडीला घाबरत नाही. पण आम्हाला ईडीची गरजच नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला.

काँग्रेस सत्ताभक्षक ! – उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात भगवे वातावरण आहे. समोर दुसरे कोण दिसतच नाही. काँगे्रेसला शेंडा-बुडका राहिला नाही. राष्ट्रवादीतच कुणी उरले नाही. सुशीलकुमार शिंदे स्वत: म्हणाले होते की, आम्ही थकलो आहोत. खरे तर ५० वर्षे खाऊन,खाऊन थकले. आता न खाणार्‍यांच्या हातात देश आला आहे. स्वातंत्र्य लढ्यात भाजप, शिवसेना नव्हती. त्या वेळी काँग्रेसमध्ये टोलेजंग व्यक्तिमत्वे होती. त्यांची नावे घेतल्यावर माना आदराने खाली जायच्या. आता जी पिलावळ आहे, त्यांची नावे घेतली की शरमेने माना खाली जात आहेत. कारण त्यांचा विचार गेला आणि सत्तेचा विकार जडला. ते नरभक्षकाप्रमाणे सत्ता भक्षक बनले आणि मोठी काँग्रेस जमीनदोस्त झाली, असा घणाघाती हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

भाजपने स्वा. सावरकर, म. फुले यांना भारतरत्न देण्याचा मुद्दा जाहीरनाम्यात घेऊन चांगले केले. महाराष्ट्रातील या विभूतींचे महत्त्व जगाला समजले पाहिजे. कारण राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांना पळपुटे म्हटले होते. स्वा. सावरकरांनी १४ वर्षे तुरुंगवास भोगला, नेहरुंनी १४ मिनिटे जरी भोगला असता, तर त्यांना मी वीर नेहरू म्हटले असते. राहुल गांधी लोकसभा निवडणूक हरल्यानंतर पळून गेले, खरे पळपुटे तर तुम्ही आहात, असे सांगत यंदा एका महिन्यांत दोन दिवाळी होणार आहे. एक येणारी आणि दुसरी राम मंदिराची दिवाळी होणार आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराची आठवण करून दिली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तीन संस्थांनी केलेल्या ओपिनियन पोलचे निष्कर्ष विविध मराठी वृत्तवाहिन्यांवरून शुक्रवारी प्रक्षेपित करण्यात आले. त्यानुसार, राज्यात भाजप-शिवसेना युतीची लाट असून युतीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला ६० ते ८० जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचा अंदाज आहे. अपक्ष आणि इतर पक्षांना ५ ते ११ जागा मिळण्याचे संकेत आहेत.

महाराष्ट्र विधानसभेसाठी येत्या 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. मात्र विविध राजकीय संस्थांनी मतदानापूर्वी महाराष्ट्राच्या जनतेचा कौल जाणून घेतला. नेता, सी व्होटर आणि जन की बात या तीन संस्थांचा ओपिनियन पोल शुक्रवारी विविध वृत्तवाहिन्यांवरून प्रक्षेपित करण्यात आले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तीन संस्थांनी केलेल्या ओपिनियन पोलचे निष्कर्ष विविध मराठी वृत्तवाहिन्यांवरून शुक्रवारी प्रक्षेपित करण्यात आले. त्यानुसार, राज्यात भाजप-शिवसेना युतीची लाट असून युतीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला ६० ते ८० जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचा अंदाज आहे. अपक्ष आणि इतर पक्षांना ५ ते ११ जागा मिळण्याचे संकेत आहेत.
महाराष्ट्र विधानसभेसाठी येत्या 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. मात्र विविध राजकीय संस्थांनी मतदानापूर्वी महाराष्ट्राच्या जनतेचा कौल जाणून घेतला. नेता, सी व्होटर आणि जन की बात या तीन संस्थांचा ओपिनियन पोल शुक्रवारी विविध वृत्तवाहिन्यांवरून प्रक्षेपित करण्यात आले.

- Advertisement -