परप्रांतीयांमुळे मराठी माणूस मुंबई, ठाण्यातून बाहेर

Mumbai
Raj Thackeray Dombivli sabha
राज ठाकरे यांचा घणाघात

मुंबई-ठाण्यावर रोज बदाबदा परप्रांतीयांचे लोंढे पडत असताना सरकार मात्र थंड बसले आहे, तुम्ही मात्र मुंबईतून ठाण्यात आलात आणि आता पुढे सरकत सरकत उझबेकिस्तान गाठणार आहात का? दुसर्‍या राज्यांबद्दल माझ्या मनात द्वेष नाही, मात्र किती लोंढे अंगावर घ्यायचे यालाही काही मर्यादा असते, असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात प्रचारसभेत केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता करताना त्यांनी सत्ताधार्‍यांवर शेवटचा हल्ला चढवला.

मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला. तिथून तो ठाण्यात आला आणि आता ठाण्याच्या बाहेर फेकला जाऊ लागला आहे. तुम्ही येथले मालक आहात. जमीनदार आहात, भूमिपुत्र आहात. हे तुमच्यावरचे अतिक्रमण तुम्ही सहन कसे करता? तुम्हाला संताप कसा येत नाही? लोक ट्रेनमधून पडतात, मरतात पण तुम्हाला त्याचे काहीच नाही.

राज्यात इतक्या गोष्टी घडूनही आपला महाराष्ट्र थंड, लोण्याच्या गोळ्यासारखा. आम्हाला राग यायचाच बंद झाला आहे. आम्हाला कोणाचीही किंमत नाही. लोक मरतायत मरू द्या. तुमच्यात आरे ला कारे करण्याची धमक नाही. तुमच्यामध्ये ती आगच नाही. दुसर्‍या राज्यांबद्दल माझ्या मनात द्वेष नाही, मात्र किती लोंढे अंगावर घ्यायचे यालाही काही मर्यादा असते. आज देशातील सर्वाधिक स्थलांतरीतांचे बस्तान ठाणे जिल्ह्यात आहेत. तुमच्या घरातूनच तुम्हाला बाहेर जावे लागत असताना तुम्ही इतके हतबल आणि शांत कसे राहता?, अशा प्रश्नांची सरबत्ती राज ठाकरे यांनी केली. तुमच्या उठावाची मला अपेक्षा आहे.

तुमचे सळसळते मनगट मला पाहायचे आहे. जे लोक काम न करता पुन्हा तुमच्याकडे मत मागायला येतात त्यांना घरी बसवण्याचे काम तुम्हाला करायचे आहेत. मी या निवडणुकीत तरणेबांड उमेदवार दिले आहेत. ही बुजगावणी नाहीत. यांच्यामध्ये व्यवस्थेबद्दल राग आहे. तुम्हाला न्याय देण्याची तळमळ आहे. त्यांना तुमच्या आशिर्वादाची गरज आहे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

ठाणे विभागातील मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज यांची ठाणे शहरात जाहीर सभा झाली. या सभेत राज बोलत होते. राज यांनी मनसेने केलेल्या विविध आंदोलनांचा उल्लेख करत मतदारांना विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले. प्रश्न सोडवायला सगळे मनसेकडे येतात आणि मतदान मात्र जे प्रश्न सोडवत नाहीत त्यांना करतात, अशी नाराजी व्यक्त करत काम करणार्‍यांना मतदान केले तर त्यांना आणखी हुरूप येईल आणि अधिक चांगले काम करता येईल, असेही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे उवाच
<बहुमताच्या आधारावर लहर आली म्हणून नोटा बंद <रिझर्व्ह बँकेने २ हजारच्या नोटांची छपाई बंद झाल्याचे वृत्त आहे. म्हणजे आता पुन्हा तुम्ही रांगेत उभे राहणार <निवडणुका गांभीर्याने घेत नाही, तोपर्यंत तुमच्या नशिबी हेच येणार <शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देताना जात का पाहिली जातेय <खुल्या प्रवर्गाच्या मुलांना प्रवेशासंदर्भात आश्वासन द्या <आपल्या राज्यात शिक्षकांना अजिबात किंमत नाही <भारतातून सर्वाधिक स्थलांतरित लोकं ठाणे जिल्ह्यात <जातीपातीच्या राजकारणामुळे विकास खुंटला<मनसेच्या आंदोलनानंतर मोबाइलवर मराठी भाषेची सेवा