‘भाजप-शिवसेनेचे दिवाळे काढल्याशिवाय दिवाळी साजरी करायची नाही’

Pimpari-chinchwad
अमोल कोल्हे

शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. मावळातून तसेच शेजारच्या पिंपरी-चिंचवडमधून कमळाची पाकळी ठेवायची नाही, असा निश्चय आपण सर्वांनी करूया. मतदानानंतर लगेच दिवाळी सुरु होणार आहे. देशातील तसेच राज्यातील समस्या संपवण्यात अपयशी ठरलेल्या भाजप-शिवसेना सरकारचं दिवाळं काढल्याशिवाय यंदाची दिवाळी साजरी करायची नाही, असे आवाहन डॉ. अमोल कोल्हे यांनी मावळवासीयांना केले. ते उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या, तरुणांचा रोजगार, माता भगिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल, या सगळ्या समस्यांबाबतीत भाजप सरकार नापास झाले आहे. निवडणुकीसाठी भाजप सरकारकडे आता कोणतेच मुद्दे शिल्लक नाहीत. निवडणूक मावळची, मुद्दा काश्मीरचा, मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचा, ही अशी निवडणूक असती होय?, असा सवाल अमोल कोल्हे यांनी लोणावळ्यात सत्ताधाऱ्यांना केला.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना सभास्थळी येण्यास उशीर झाल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करताना तिरकस टीका केली. मावळच्या रस्त्यावर ४०० कोटी खर्च झाले असते तर मी अर्धा तास लवकर आलो असतो, असे ते म्हणाले. ही निवडणूक महाराष्ट्राच्या भविष्याची निवडणूक आहे. आता मात्र सुनील शेळके यांच्या शिवाय पर्याय नाही. ज्यांना भिडण्यासाठी दोन-दोन मुख्यमंत्री येतात. मध्यंतरी भाजपचा अजगर झाला होता. ईडी, सीबीआय, असे फुत्कार टाकून राष्ट्रवादीची माणसे गिळणाऱ्या या अजगरावर ७९ वर्षाच्या शरद पवार नावाच्या तरुणाने वर्मी घाव घातला.

भाजपचे राजकारण खालच्या थराचे आहे

राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके म्हणाले की, जनतेच्या ताकदीवरती विश्वास ठेवूनच मला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. मी आजपर्यंत कुठल्याच पक्षावर टीका केली नाही. निवडणूक विचारांची लढाई व्हायला पाहिजे. प्रत्येकाला मत मांडण्याची मुभा आहे. मी जसा आहे, तसा जनतेने स्वीकारले आहे. विरोधक आणि मी एकाच तालमीतले आहोत. भाजपचे राजकारण खालच्या थराचे आहे. मला पाडण्यासाठी दोन-दोन मुख्यमंत्र्यांना का आणावे लागले? मावळवासियांनो, फक्त एक संधी द्या. मला मान नको, सन्मान नको. फक्त शाबासकीची थाप द्या, असे आवाहन शेळके यांनी केले.

हेही वाचा –

अयोध्या राम मंदिर प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होणार?