घरमुंबईराष्ट्रवादीच्या ५० आमदारांना रात्री उशिरा दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवलं!

राष्ट्रवादीच्या ५० आमदारांना रात्री उशिरा दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवलं!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हॉटेल रेनेसाँमधल्या आमदारांना रविवारी रात्री उशिरा विमानतळाजवळच्या हॉटेल हयातमध्ये हलवण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला असला, तरी अजूनही महाराष्ट्रातला सत्तापेच कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला ३० नोव्हेंबर हा दिवस बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेला असतानाच अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतेक आमदार पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात परत आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर घोडेबाजाराची शक्यता लक्षात घेऊन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून आपल्या आमदारांवर करडी नजर ठेवली जात आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ५० आमदारांना रविवारी रात्री उशिरा पवईच्या हॉटेल रेनेसाँमधून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या हॉटेल हयातमध्ये हलवण्यात आलं आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी ही काळजी घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

अजित पवारांकडे एकच आमदार शिल्लक

रविवारी दिवसभरात भाजपचे आमदार किंवा अजित पवार यांच्या जवळच्या लोकांनी हॉटेल रेनेसाँमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची भेट घेतल्याचं सांगितलं जात होतं. काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट रेनेसाँमध्ये रुम बुक केल्याचं देखील बोललं जात होतं. त्यामुळे कुठलाही दगाफटका टाळण्यासाठी पक्षाकडून ही काळजी घेण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ५४ निर्वाचित आमदारांपैकी ५२ आमदार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात परतले असून आता फक्त खुद्द अजित पवार आणि त्यांचे विश्वासू मानले जाणारे पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे हेच फक्त भाजपसोबत आहेत. त्यामुळे बहुमत चाचणीमध्ये भाजप कसं बहुमत सिद्ध करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


हेही वाचा – अजून ३ आमदार राष्ट्रवादीकडे परतले, अजित पवारांकडे आता एकच आमदार

दोन्ही बाजूंचा बहुमताचा दावा!

दरम्यान, एकीकडे अजित पवारांनी ट्वीटरच्या माध्यमातून भाजपसोबत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने महाराष्ट्राला स्थिर सरकार देणार असल्याचं जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं असतानाच, दुसरीकडे शरद पवारांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबतच असल्याचं ठामपणे सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी बहुमताचा आकडा आपल्याकडे असल्याचा ठाम दावा केला आहे. महाविकासआघाडी अर्थात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी सकाळी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना आमदारांच्या पाठिंब्याच्या सह्या असलेलं पत्र देखील सादर केलं आहे. त्यामुळे आता ३० नोव्हेंबरच्या बहुमत चाचणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -