ना मुख्यमंत्रीपद, ना एकहाती सत्ता

उध्दव ठाकरेंचा शिवसैनिकांना अनोखा धक्का

Mumbai
cm uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्वाणीचा इशारा

राज्यात एकहाती सत्ता आणण्याचे, राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसैनिकाला बसवण्याचे आणि ५० टक्के जागांचे आजवर शिवसेनेने पाहिलेले स्वप्न आता स्वप्नरंजन झाले आहे की काय, असाच सवाल आता शिवसैनिकांना पडू लागला आहे. हेच विषय घेऊन शिवसेनेने गेल्या दोन महिन्यात भारतीय जनता पक्षाला सतावून सोडले. सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे या मागणीवर ठाम होते, त्यामुळे याविषयी काही घोषणा होईल, असे वाटत होते. असे असताना शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणात या सगळ्या विषयांना अक्षरश: फाटा देण्यात आला. हे सगळे विषय उध्दव ठाकरेंच्या भाषणातून दुर्लक्षित झाले. मग हा आटापिटा कशासाठी होता, असा स्वाभाविक प्रश्न सैनिकांना पडला आहे.

राज्य विधानसभा निवडणुकीसाठी युतीच्या आणाभाका घेणार्‍या शिवसेनेने युती करताना मात्र भाजपवर अनेक अटी घातल्या होत्या. यात राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकाला बसवण्याच्या मागणीचा उल्लेख होता. अगदी गेल्या मंगळवारी शिवडीच्या शिवसैनिकांंनी आयोजिलेल्या मेळाव्यात सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी उध्दव ठाकरेंच्या स्वप्नाला उचलून धरले होते. राज्याचे नेतृत्व हे आदित्य ठाकरेंकडे असेल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य चालेल, असे राऊत बोलून गेले, तेव्हा लाला लजपतराय महाविद्यालयाच्या सभागृहात टाळ्यांचा एकच गजर झाला. मुख्यमंत्रीपदी आदित्य ठाकरेंना बसवण्याचा सेनेचा पण राऊतांच्या भाषणातून स्पष्ट दिसत होता. सेनेच्या या मागणीचे भाजपने केव्हाच मातेरे करून टाकले होते. त्याऐवजी आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करण्याचा इरादा भाजपकडून बोलून दाखवण्यात आला. पण तोही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उडवून लावला. त्याआधी सेनेला ५० टक्के जागा न मिळाल्यास युती नाही, असा इशाराही राऊत आणि काही नेत्यांनी जाहीररित्या दिला होता. यावर मुलामा म्हणून जिंकून आलेल्या जागांव्यतिरिक्त जागांची समसमान वाटणी करण्यावर सेना नेते खाली आले. प्रत्यक्षात तडतोड ही १२४ जागांवर करण्यात आली. पुढे तर हाही विषय युती झाल्यापासून सेना नेत्यांच्या तोंडी येईनासा झाला.

सेनेच्या शिवतीर्थावरील मेळाव्यात याबाबत वाच्यता होईल आणि आदित्य हेच राज्याच्या नेतृत्वाचे मानकरी असतील, अशी घोषणा होईल, असे वाटत होते. पण यातला एकही शब्द उध्दव ठाकरेंच्या तोंडून आला नाही. उलट ज्या इच्छुक शिवसैनिकांना जागा मिळाल्या नाहीत त्यांची माफी मागून उध्दव मोकळे झाले. सर्वात आश्चर्याची बाब ही की या निवडणुकीतील सेनेच्या जवळपास २७ उमेदवारांपुढे भाजपच्या अपक्षांनी जाळे टाकले आहे. या बंडखोरांना आवरा म्हणून सेनेचे विद्यमान आमदार उध्दव ठाकरेंकडे याचना करत असतानाही भाजपच्या बंडखोरांबाबत एका शब्दानेही उध्दव ठाकरेंनी समज दिली नाही. केवळ नरमाई आणि विरोधी पक्षांची हजामत हा एकमेव कार्यक्रम म्हणजे शिवतीर्थावरील सेनेचा मेळावा होता, अशीच चर्चा आहे.