घरमुंबईमाझ्यासमोर कोणीही प्रतिस्पर्धी नाही - सदा सरवणकर

माझ्यासमोर कोणीही प्रतिस्पर्धी नाही – सदा सरवणकर

Subscribe

2014 साली आमदार म्हणून निवडून आलेले सदा सरवणकर हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी सदा सरवणकर यांच्या विरोधात मनसेचे याच मतदारसंघातील माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांचे कडवे आव्हान आहे.

दादर-माहिम या विधानसभा मतदार संघात गेली अनेक वर्षे शिवसेनेचे वर्चस्व आहे. 2009 चा अपवाद वगळता याच मतदारसंघातून शिवसेनेची सरशी झाली आहे.2014 साली आमदार म्हणून निवडून आलेले सदा सरवणकर हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी सदा सरवणकर यांच्या विरोधात मनसेचे याच मतदारसंघातील माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांचे कडवे आव्हान आहे. परंतु, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपल्यासमोर विशेष प्रतिस्पर्धी नसल्याचा दावा माहीम मतदारसंघाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी ‘माय महानगर’च्या ‘खुल्लमखुल्ला’ या फेसबुक लाईव्हमध्ये केला आहे.

मतदारसंघातून पुन्हा तुम्हालाच का संधी ?

हे माझे भाग्य आहे की मला दादर-माहिम मतदारसंघातून शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उमेदवारी दिली. या मतदारसंघात शिवसेनेचे शिवसेना भवन, शिवसेनाप्रमुखांची जन्मभूमी, सिद्धिविनायक मंदिर, शिवाजी पार्क या मतदार संघात आहे. सर्व दृष्टीने महत्त्वाची जी स्थळ आहेत ती याच मतदारसंघात आहेत.

- Advertisement -

दोन वेळेस आमदार राहुनही अनेक प्रश्न प्रलंबित का आहेत?

हा मतदारसंघ संमिश्र असून झोपडपट्टी, जुन्या आणि टोलेजंग इमारती, सोसायटी, मिठी नदीसारखा मोठा नाला आहे. या मतदारसंघातील जे काही दैनंदिन प्रश्न आहेत किंवा नागरी सुविधा देण्याचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केला आहे. मात्र धोरणात्मक निर्णयामुळे जे प्रश्न प्रलंबित आहेत जसे की, जुन्या इमारती, मिठी नदी, 16 हजार उपकर प्राप्ती इमारतींचा पुनर्विकास किंवा झोपडपट्टी. त्यामुळे, जेवढे या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे होते ते देता आलेले नाही. शासनाच्या धोरणाप्रमाणे प्रत्येकाला साधारणपणे 500 चौरस फुटाचे घर देणे हे आमचं स्वप्न आहे. पुढील पाच वर्षात याच गोष्टींच्या कामाला मी लागणार आहे.

कोणकोणती महत्त्वाची कामे पुढच्या पाच वर्षात करणार?

माझ्या मतदारसंघात बर्‍यापैकी झोपडपट्टी आहे. साईसुंदर नगर, नेहरुनगर, शास्त्रीनगर, शापूरजी पालनजी त्यानंतर अहुजा या ठिकाणच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या चार हजार कुटुंबांना घर देण्यात यश आले आहे. शिवसेना प्रमुखांनी जाहीर केलेल्या 40 लाख झोपडपट्टी वासियांची योजना पूर्णत्वास नेण्यासाठी जेवढे प्रयत्न करणे शक्य आहे, ते सर्व प्रयत्न मी केले आहेत.

- Advertisement -

फेरीवाल्यांबाबतची तुमची भूमिका काय?

ज्यावेळेस मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. तेव्हा फेरीवाल्यांसंदर्भात एक नियोजन केले होते. हॉकर्स प्लाझा नावाची एक इमारत उभी करण्यात आली होती. या इमारतीत दादरमधील सर्व फेरीवाले बसवायचे असे नियोजन झाले होते. महानगरपालिका आणि स्थायी समितीचा मी अध्यक्ष असताना 28 करोड रुपये खर्च करुन ही इमारत बांधण्यात आली होती. पण, ज्या प्रमाणे फेरीवाल्यांनी त्या इमारतीत जाऊन व्यवसाय करणे अपेक्षित होते त्याप्रमाणे तो झाला नाही. त्या फेरीवाल्यांना काही लोकांनी इमारतीत जाण्यापासून रोखले होते. काहींच्या विरोधामुळे दादरच्या फेरीवाल्यांचा प्रश्न अजून तसाच राहिला आहे.

तुमचा मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहे?

मला असे वाटते या निवडणुकीत विशेष असा प्रतिस्पर्धी कोणी दिसतच नाही. शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे. 5 शिवसेनेचे नगरसेवक आणि एक भाजपचा आहे. तसेच, शिवसेना आणि भाजपची युती असल्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेचे पूर्णपणे वर्चस्व आहे. इथे जे इतर उमेदवार आहेत त्यांनी त्यांचे डिपॉझिट जरी राखले तरी त्यांच्यासाठी हे एक मोठे काम होईल.

मनसे तुमचा प्रतिस्पर्धी आहे का?

मनसेचा आता एकही नगरसेवक नाही. कुठलाही लोकप्रतिनिधी नाही. गेल्या पाच वर्षांत मनसेने कोणती समाजसेवा केलेली नाही. फक्त राजकारण करणे आणि सामाजिक कामात अडथळ निर्माण करणे अशीच कामे मनसेने केली आहेत. साईसुंदर नगरमध्ये जिथे आम्ही चार हजार लोकांना घरे देण्याची योजना राबवत होतो तिथे ही वेगवेगळी कारणे देऊन ती योजना बंद करण्याचे काम मनसेच्या माध्यमातून झाले आहे. काही वेळेला तर मुले आणून जे कंत्राटदार होते त्यांना धमकावून, दादागिरी करुन पळवून लावण्याचे काम ही मनसेकडून करण्यात आले आहे.

संदीप देशपांडेंचे आव्हान आहे का?

मला वाटत नाही त्यांनी कुठे काम केले आहे. कारण, त्यांनी केलेली कामे कुठेही मतदारसंघात दिसत नाही. समाजपयोगी कामे किंवा लोकांसाठी धावून जाणे हा काही संदीप देशपांडेचे पिंड नाही. त्यांनी फक्त चॅनलवर जाऊन स्वत: ची प्रसिद्ध करणे, प्रसिद्धीची कामे करणे हे एवढेच आहे. त्यामुळे, त्यांचे आव्हान तर मला अजिबातच नाही. त्यामुळे, त्यांनी त्यांचे डिपॉझिट सांभाळावे असे मला वाटते.

यंदा किती मताधिक्याने निवडून याल असे वाटते ?

2014 मध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले होते. त्यावेळेस मी 6 हजार मताधिक्याने निवडून आलो होतो. यावेळेस जे सहा नगरसेवक आहेत त्यांनी या मतदारसंघात चांगली कामे केली आहेत. आमदार म्हणून मी 25 कोटींची कामे या मतदारसंघात केली आहे. त्याचा फायदा निश्चितपणे मला यावेळेस होईल. या कामांचे रुपांतर मतदानात करण्यात आम्हाला यश येईल असे मला वाटते.मातोश्रीवरुन मिळालेल्या आशिर्वादामुळे शिवसेनेचा विभागप्रमुख हा ताकदवान बनतो. साधारणत: 70 हजारांचं आम्हाला मताधिक्य मिळावे अशी माझी अपेक्षा आहे. त्याच दृष्टीने आमच्या प्रचाराला सुरूवात झालेली आहे. युतीबाबतचा निर्णय पक्षप्रमुखांचा आहे आणि ते सक्षम आहेत.

आदित्य ठाकरेंना तुमच्या मतदारसंघातून उमेदवारी दिली असती का?

समाधान सरवणकर यांनी जेव्हा मिसळ महोत्सव भरवला होता. त्यावेळेस मी आदित्य ठाकरेंना स्वत: भेटलो होतो. त्यांनी दादर मतदारसंघातून उमेदवारी लढवावी यासाठी विनंती केली होती. शिवाय, हा मतदारसंघ शिवसेनेच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा आहे, अशा पद्धतीची विनंती केली होती. पण, त्याचवेळी त्यांनी मला सांगितले की तुम्ही या मतदारसंघात सक्षम असे उमेदवार आहात आणि आपणच ती निवडणूक लढवावी असे त्यांनी मला सांगितले.

ठाकरे घराण्याच्या तिन्ही पिढ्यांमधील नेमके वैशिष्ठ्य काय?

ठाकरे कुटुंब हे एक प्रेमळ कुटुंब आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे आम्ही कुटुंबाचे चालक म्हणून बघतो. बाळासाहेबांनी जी कुटुंब प्रमुखांची भूमिका बजावली त्याच तोलामोलाची जबाबदारी उद्धव ठाकरे देखील सांभाळत आहेत. माझ्या पत्नीचे निधन झाले त्यावेळेस उद्धव ठाकरे स्वत: आले होते. त्यांच्या भावना आम्हाला पूर्णपणे कळतात. ते आमच्या दु:खाच्या वेळेसही धावून येतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दल नितांत प्रेम हे शिवसैनिकांमध्ये आहे.

काँग्रेसमध्ये होता तेव्हाचा अनुभव कसा होता?

आयुष्यात काँग्रेसमध्ये जाणे ही मोठी चूक होती. एखादा जेव्हा अपघात घडतो तेव्हा तो कोणत्या ही हेतूने घडवलेला नसतो. शिवसेना पक्ष आम्हाला जीव की प्राण वाटतो. जो अपघात घडला होता तो पक्ष आमचा नव्हताच. त्या अपघाताने आम्ही तिथे काही दिवस होतो. त्यामुळे आम्ही ते केव्हाच विसरुन गेलो आणि यापुढे फक्त शिवसेनाच जीव की प्राण आहे.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -