घरमहाराष्ट्रउत्तर मध्य मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्वाची लढाई

उत्तर मध्य मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्वाची लढाई

Subscribe

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्याप्रमाणे शिवसेना, भाजपची तयारी सुरू झाली झाली आहे. या दोन तुल्यबळ पक्षांच्या समोर आता तगडा उमेदवार कोणता द्यायचा, या प्रश्नाने काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रासले आहे. लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित निकालामुळे दोन्ही काँग्रेसचा विश्वास कमी झालेला आहे. तसेच दोन्ही काँग्रेसला लागलेली गळती हीदेखील डोकेदुखी बनली आहे. उत्तर मध्य मतदार संघातील काँग्रेसवरही या सर्व वातावरणाचा परिणाम झालेला दिसत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक ही काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे.

उत्तर मध्य हा खरेतर काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ आहे. या मतदार संघात वर्षानुवर्षे काँग्रेसचा स्वतंत्र मतदार आहे. मात्र तरीही लोकसभा निवडणुकीत या ठिकाणचा निकाल अनाकलनीय लागला, त्याचा काँग्रेसला जोरदार फटका बसला. आता विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्यात जरी युती झाली किंवा झाली नाही, तरी त्याचा विरोधकांना फार फायदा होणार नाही. जसे लोकसभेत देशाचा विचार केला जातो किंवा चांगल्या उमेदवारांचा विचार केला जातो. तसे विधानसभेतही उमेदवारांचा विचार केला जातो. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले विलेपार्ले येथील भाजपचे आमदार पराग अळवणी, वांद्रे पश्चिम मधील भाजपचे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार, कालीनातील शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांनी त्यांच्या मतदारसंघात चांगली पकड बसवली आहे. त्यामुळे ते पुन्हा निवडून येतील यात काही शंका नाही. कारण या तीनही आमदारांनी त्यांचा मतदारसंघ चांगला बांधून ठेवला आहे.

- Advertisement -

काँग्रेस, राष्ट्रवादीची ताकद घटली
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास कमी झाला आहे. राष्ट्रवादीकडून आपली संघटना वाढावी यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाही. याठिकाणी राष्ट्रवादीची संशयास्पद भूमिका राहिली आहे, इथे राष्ट्रवादी काँग्रेस हा शिवसेनेला छुपा पाठिंबा देत काँग्रेसचा उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्नरत असतो.

काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर
येथील काँग्रेसमधील मतभेद अनेकदा समोर आले आहेत. त्याचा परिणाम कार्यकर्त्यांवर झाला आहे. संजय निरुपम विरुद्ध मिलिंद देवरा असे दोन गट अनेकदा या वादाला कारणीभूत असतात. पूर्वी मुरली देवरा विरुद्ध गुरुदास कामत हा वाद होता, आता मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यात वाद आहे. गुरुदास कामत यांच्या निधनानंतर तरी काँग्रेसमधील वाद संपेल, असे वाटत होते, पण तसे झाले नाही. अजूनही ही गटबाजी कायम आहे. नुकताच राजकारणात प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने देखील या गटबाजीवर अनेकदा टिका केली. काँग्रेसमध्ये असलेल्या समस्यांविषयी याबाबत उर्मिलाने मिलिंद देवरा यांना पत्र लिहून कळवले. मात्र नेतृत्त्वाकडून दखल घेतली जात नसल्याने उर्मिला मातोंडकर काँग्रेसमधून बाहेर पडली. उर्मिला सारखा नवा चेहरा काँग्रेसमध्ये असल्याचा फायदा काँग्रेसला करुन घेता आला असता पण, इथेही प्रदेश नेतृत्त्वाने निराशाच केली.

- Advertisement -

उत्तर मध्य मतदारसंघात कृपाशंकर सिंह, नसीम खान, बाबा सिद्धीकी, प्रिया दत्त असे दिग्गज चेहरे काँग्रेसकडे आहेत. कृपाशंकर सिंह यांना ज्या काँग्रेसने भरभरुन दिले, त्यांनी आता भाजपचे कमळ हातात घेतले. प्रिया दत्त यांच्यामागे काँग्रेसची ताकद किती उभी राहिल, याविषयी शंका आहे. बाबा सिद्धीकी यांचे मतदारसंघात वजन कमी झाले आहे. तर, सध्याचे चांदीवलीतील विद्यमान आमदार नसीम खान हे पुन्हा निवडून येणार की नाही, ते युतीवर अवलंबून आहे. जर युतीने नसीम खान यांच्याविरोधात तगडा उमेदवार दिला तर नसीम खान यांना ही निवडणूक जिंकणे कठीण जाईल.

वांद्रे पूर्व येथील शिवसेनेचे आमदार तृप्ती सावंत पोटनिवडणुकीत निवडून आल्या. पण, त्यांचे स्वत:चे असे अस्तित्व नसून मतदारसंघातही त्यांचा प्रभाव नसल्याचे बोलले जात आहे. अनेकदा विधानसभेत जनतेच्या प्रश्नांवर त्या गप्प असल्याचे दिसून आले. कुर्ल्यातील मंगेश कुडाळकर यांचाही मतदारसंघात तितका प्रभाव राहिला नाही.

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ
एकीकडे हायक्लास लोकवस्ती तर दुसरीकडे याच मतदारसंघात नर्गिस नगरसारखी झोपडपट्टी आहे. त्यामुळे एकीकडे सेलिब्रिटी, उच्चभ्रू आणि दुसरीकडे सामान्य, झोपडपट्टीवासी असे दोन टोकांचे मतदार या मतदारसंघात मोठ्या संख्येने आहेत. पाली हिलची उच्चभ्रू लोकवस्ती आणि सेलिब्रिटी, सिनेकलाकार यांचे वास्तव्य म्हणून या मतदारसंघाकडे विशेष लक्ष असते. वांद्रे पश्चिम या विधानसभा मतदारसंघात अ‍ॅड. आशिष शेलार हे विद्यमान आमदार आहेत. शेलारांकडे सध्या शिक्षण खात्याच्या मंत्रीपदाचीही जबाबदारी आहे. त्यांनी मतदार संघातील या सर्व गटातील मतदारांना बांधून ठेवण्यात यश मिळवले आहे.

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ
हा मतदारसंघ शाबूत ठेवण्यासाठी यंदा शिवसेनेला बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या या ठिकाणी शिवसेनेच्या तृप्ती सावंत ह्या आमदार आहेत. तर, भाजपच्या पूनम महाजन या विद्यमान खासदार आहेत. हा मतदारसंघ लोकसभा क्षेत्रासाठीही महत्त्वाची भूमिका बजावणारा होता. याच भागात मातोश्री निवासस्थान, बीकेसीचा कॉर्पोरेट परिसर, मराठी मध्यमवर्गीय माणसाच्या शासकीय वसाहती आणि स्टेशनला लागून असलेली मोठी झोपडपट्टी आहे. या मतदारसंघातील मतदार सध्या नाराज असल्याचे दिसून येत आहे. सध्या या मतदार संघातून महापौर विश्वनाथ महाडेश्वर इच्छूक आहेत, परंतु महापौरांच्या वारंवार वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. म्हणून या ठिकाणी सदा परब यांचे नाव चर्चेत आहे. तसेच, मनसेकडून यंदा अखिल चित्रे यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. तसेच, काँग्रेसकडून बाबा सिद्धीकी यांचा मुलगा झिशांत सिद्धीकी हादेखील तयारी करत आहे.

चांदिवली विधानसभा मतदारसंघ
मुस्लिम उमेदवार दिल्यास याचा मोठा फटका नसीम खान यांना बसण्याची शक्यता आहे. पण, या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा नसला तरी नसीम खान यांचा देखील एक मोठा मतदार आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभेला होणारी एकतर्फी निवडणूक यंदा मात्र प्रचंड चुरशीची होणार हे नक्की. कारण, नसीम खान यांचे सर्व युतीवर अवलंबून आहे. शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे हे या विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

मतदार संघ आणि आमदार
विलेपार्ले – अ‍ॅड. पराग अळवणी (भाजप)
चांदिवली – आरीफ नसीम खान (काँग्रेस)
कुर्ला – मंगेश कुडाळकर (शिवसेना)
कालीना – संजय पोतनीस (शिवसेना)
वांद्रे पूर्व – तृप्ती सावंत (शिवसेना)
वांद्रे पश्चिम – अ‍ॅड. आशिष शेलार (भाजप)

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -