घरमुंबईउत्तर मुंबईत उतरती कळा

उत्तर मुंबईत उतरती कळा

Subscribe

दहिसर,बोरीवली,मागाठाणे,चारकोपमध्ये मतदानांचा टक्का घसरला

उत्तर मुंबई लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे मतदार बाहेर पडून त्यांनी मतदानांसाठी गर्दी केली होती, त्यातुलनेत या मतदार संघातील सहा विधानसभा मतदार क्षेत्रांमध्ये मतदारांचा उत्साह पाहायला मिळायला नाही. लोकसभा निवडणुकीच्यावेळी उतरलेला मतदार या विधानसभा निवडणूक मतदानासाठी बाहेर पडलेला नाही. विशेष म्हणजे लोकसभेला बोरीवली मतदार संघात ६६ टक्के मतदान झाले होते, परंतु सकाळपासून या मतदार संघांमध्ये मतदार मोठ्या उत्साहाने बाहेर पडताना दिसले नाही. मालाड आणि मागाठाणे वगळता भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येवू शकतो. मात्र मालाडमध्ये भाजप आणि मागाठाणेत शिवसेना उमेदवारांची धाकधुक वाढवली गेली आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील दहिसर विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीच्यावेळी ६२ टक्के मतदान झाले होते. परंतु मतदान केंद्रावर गर्दी कमी दिसली. दहिसरमधील भावदेवी सांस्कृतिक आणि क्रीडा केंद्राच्या मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती. पावसामुळे मैदानावर चिखल झाल्याने गोण्या टाकून मतदारांसाठी वाट करून देण्यात आली आहे. परंतु एकूणच या मतदान संघातील कल पाहता महायुतीच्या उमेदवार मनिषा चौधरी यांच्या बाजुने कौल झुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

बोरीवलीतही मतांचा टक्का घटला
लोकसभा निवडणुकीत एकूण ६६ टक्के मतदान झालेल्या बोरीवलीतील शेठ एम.के. हायस्कूल, आर.सी पटेल हायस्कूल तसेच मातुश्री पुष्पाबेन विनूभाई वालिया कॉलेज,गोखले एज्युकेशन सोसायटी आदी मतदान केंद्रांवर फारशी गर्दी पाहायला मिळत नव्हती. संध्याकाळपर्यंत या मतदार संघात एकूण ४८.४१ टक्के एवढे मतदान झाले होते. या मतदार संघातून विद्यमान आमदार विनोद तावडे यांचा पत्ता कापून वरळीतील सुनील राणे यांना उमेदवारी दिल्यामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळेच ते बाहेर पडू शकले नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, एकूणच मतदान भाजपचे सुनील राणे यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

मागाठाणेत सुर्वेंची वाढली धाकधुक
मागाठाणे मतदार संघातूनही मतदारांचा तसा उत्साह पाहायला मिळाला नाही. संध्याकाळपर्यंत या मतदार संघात ४८.२६ टक्के एवढे मतदान झाले होते. , जय महाराष्ट् नगर एम.एच.बी कॉलनी,रावलपाडा येथील विद्याभुषण शाळेसमोरील खेळाच्या मैदानातील मतदान केंद्रात तसेच अन्य केंद्रांमध्ये मतदानाच्या रांगाच नव्हत्या. मतदानासाठी येणार्‍यांना रांगा लावण्याची गरज भासत नव्हती. या मतदार संघात विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांच्याविरोधात कदम यांनी आव्हान निर्माण केल्याने सुर्वे यांची धाकधुक अधिकच वाढली आहे.

- Advertisement -

भातखळकरांचे मताधिक्य होणार कमी
कांदिवली पूर्व मतदार संघात संध्याकाळपर्यंत ४५.२७ टक्के मतदान पार पडले. या मतदान केंद्रांमध्ये लोकसभेला ५५.७१ टक्के एवढे मतदान झाले होते, त्या तुलनेत संध्याकाळपर्यंत ४५.२७ टक्के मतदान झाले होते. या मतदार संघातील अशोक नगर नवीन महापालिका शाळा, समता नगर महापालिका शाळा, समता विद्या मंदिर आदी मतदान केंद्रांमध्ये मतदान केंद्रांमध्ये गर्दी दिसून येत नव्हती. या मतदार संघात महायुतीचे अतुल भातखळकर आणि काँग्रेसच्या अजंता यादव हे निवडणूक रिंगणात असल्या तरी मतदारांचा निरुत्साह आणि मतदानात भाग घेतलेल्या मतदारांचा विचार करता भातखळकर यांच्या मताधिक्य कमी होण्याचीही शक्यता आहे.

चारकोपमध्येही निरुत्साह
चारकोप मतदार संघातही मतांची टक्केवारी कमी झालेली पाहायला मिळत आहे. भाजपचे योगेश सागर आणि काँग्रेसचे काळू बुंदेलिया यांच्या प्रमुख लढत असली तरी मतांची घटलेली आकडेवारी भाजपची चिंता वाढवणारी आहे. पोयसर जिमखाना आणि आयआयटी चारकोप नाका येथील मतदान केंद्रांमध्येही लोकसभेप्रमाणे मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला नाही. संध्याकाळपर्यंत या मतदार संघात ४७.१८ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे बुंदेलियांच्या आव्हानापुढे सागर यांचे मताधिक्यही घटेल अशी शक्यता आहे.

मालाडमध्ये गोंधळ, अस्लमच्या हॅट्ीकसमोर आव्हान
लोकसभा मतदार संघाच्या तुलनेत मालाड-मालवणीतील काही मतदान केंद्रांमध्ये मतदारांची गर्दी पाहायला मिळत होती. या मतदार संघात भाजपचे रमेश सिंह ठाकूर यांच्या समर्थकांची काही माणसे सुरक्षा रक्षकांसह मतदान केंद्रांमध्ये शिरल्याने तसेच मतदार यादींमध्ये नावेच नसल्याने दुपारी काही प्रमाणात गोंधळ झाला होता. त्यामुळे मतदान केंद्र परिसराची सुरक्षा वाढवून राज्य राखीव दलाच्या पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली होती. मतदान केंद्राच्या परिसरांमध्ये अन्य कुणालाही प्रवेश देण्यात येत नव्हता. मात्र, हा अपवाद वगळता मतदान सुरळीत सुरु होते. या मतदार संघात विद्यमान आमदार काँग्रेस उमेदवार अस्लम शेख यांच्यासमोर भाजपचे रमेशसिंह ठाकूर यांनी आव्हान उभे केल्यामुळे मतदार पुन्हा शेख यांना हॅट्ीक करायला देतात की रमेशसिंह ठाकूर यांना स्वीकारता याचे भविष्य मतदान पेटीत बंदिस्त आहे

मतदार संघ आणि झालेले मतदान ( टक्के)
बोरीवली – ४८.४१% (लोकसभा मतदान: ६६.१९%)
दहिसर – ४८.६४% (लोकसभा मतदान :६२.३९%)
मागाठाणे – ४८.२६% (लोकसभा मतदान :५७.७१ %)
कांदिवली पूर्व – ४५.२७% (लोकसभा मतदान :५५.७१%)
चारकोप – ४७.५८% ( लोकसभा मतदान :६०.८०%)
मालाड पश्चिम – ४७.३१%( लोकसभा मतदान :५६.९२% )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -