घरमुंबईमतदानासाठी पालघर सज्ज

मतदानासाठी पालघर सज्ज

Subscribe

3 हजार 960 पोलिसांची कुमक,14 हजार 114 अधिकारी-कर्मचारी

पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हाभर 3 हजार 960 पोलिसांसह केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि एसआरपीएफच्या सहा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर मतदान प्रक्रिया सुुरळीत पार पडावी यासाठी 14 हजार 114 अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात 2 हजार 193 मतदान केंद्रे असून त्यातील 33 संवेदनशिल म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यापैकी एकट्या नालासोपारा शहरात 24 मतदार केंद्र असून बोईसरमध्ये सात आणि वसई, विक्रमगडमध्ये प्रत्येक एक-एक मतदान केंद्र आहे. जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस अधिक्षकांसह दोन अपर पोलीस अधिक्षक, 10 डीवायएसपी, 29 पोलीस निरीक्षक, 127 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 2 हजार 260 पोलीस कर्मचारी, 1 हजार 242 होमगार्ड मिळून 3 हजार 960 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सोबत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि एसआरपीएफच्या सहा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात लाठ्या, हेल्मेट, अश्रुधूरआदी सामुग्री तयार ठेवण्यात आली आहे. तर मुख्यालयात दंगल नियंत्रण पथक आणि जलद प्रतिसाद पथक तयार ठेवण्यात आले आहे. सर्व पोलिसांच्या रजा रद्द करुन त्यांना कामावर त्वरीत हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

- Advertisement -

दुसरीकडे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली 14 हजार 114 अधिकारी-कर्मचार्‍यांची फौज निवडणुका पार पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. विधानसभा मतदार संघात दिव्यांग, गरोदर माता, वृद्ध मतदारांना मतदान केंद्रावर ने-आण करण्याकरीता वाहन व्यवस्था करण्यात येत आहे. त्याकरीता एकुण 245 वाहने ठेवण्यात येत आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनांनुसार ईव्हीएम वाहतुक करणार्‍या सर्व गाड्यांना जीपीएस सुविधा उपलब्ध करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत. महराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 170 बसेस व खाजगी 706 जीप, ऑटो व 192 खाजगी बसेस यांच्यावर जीपीएस सुविधा बसवण्यात येत आहे. यासह सहा बोटींची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी, पालघर, अग्निशमन विभाग, परिवहन महामंडळ, डाक विभाग, कोस्ट गार्ड, प्रायवेट मोबाईल सेवा पुरवठादार कंपनी यांच्या सेवा प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघामध्ये 19 लाख 51 हजार 668 इतके मतदार असून 2 हजार 193 एकुण मतदार केंद्र आहेत. नालासोपारा मतदारसंघामध्ये मंडप असलेले 25 मतदान केंद्रे असून मंडप असलेल्या इमारतीमधील मतदान केंद्रे 8 आहेत. वसई मतदार संघामध्ये मंडप असलेले 18 मतदान केंद्रे असून मंडप असलेल्या इतारतीमध्ये 5 मतदान केंद्रे आहेत. वरील दोन्ही मतदान संघामध्ये मंडप असलेले मतदान केंद्रे एकुण 43 असून मंडप असलेल्या इमारतीमधील मतदान केंद्रे एकुण 13 आहेत. पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रावर उद्ववाहनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये 4 हजार 830 दिव्यांग मतदार असून दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर व वाहनाची प्रत्येक मतदान केद्रांवर व्यवस्था करण्यात आली असून दिव्यांग मतदाराकरीता मतदान केंद्रावर 1 हजार 053 व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येत असुन स्वयंसेवक नियुक्त केले आहेत. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या मतदान केंद्र इमारतीवर किमान 2 याप्रमाणे स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांचेमार्फत दिव्यांग मतदार, गरोदार माता, वृदध मतदार यांस सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

सैनिक मतदारांची संख्या 310 असुन या सर्व सैनिक मतदारांना मतदान पत्रिका पाठवण्यात आल्या आहेत. नेट / मोबाईल कनेक्टीव्हिटी नसलेल्या ठिकाणी पोलिस विभागाची वायरलेस यंत्रणा, वॉकीटॉकी बसवण्यात येणार असून त्याठिकाणी मतदान केंद्रांशी संपर्क साधणे करता रनर्स नियुक्त करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -