पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पक्षातल्याच लोकांनी पाडले – एकनाथ खडसे

एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट

Eknath Khadse
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे

भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिनी खडसे यांचा देखील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. या पराभवाबाबत एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘पक्षांतर्गतच काही लोकांनी पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध कारवाया केल्या आणि त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. फक्त पंकजाच नव्हे तर रोहिणी खडसे यांनाही अशाच प्रकारे पाडण्यात आले’, असे एकनाथ खडसे यांनी ‘लोकमत’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

हेही वाचा – पराभवाची जाणीव पक्षाला करून दिली होती, पण ऐकलं नाही – एकनाथ खडसे

पक्षाच्या वरिष्ठांकडून कारवाईची अपेक्षा- खडसे

‘पंकजा मुंडे यांना पक्षातीलच काही लोकांकडून निवडणुकीत पाडण्यात आले. याशिवाय पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचा देखील असाच आरोप आहे. अशाप्रकारचे उद्योग करणाऱ्यांची नावे पक्षाच्या वरिष्ठांकडे पुराव्यासह देऊन कारवाईची मागणी केलेली आहे. त्यावर कारवाईची प्रतिक्षा आहे’, असे खडसे म्हणाले. ‘रोहिणी खडसे यांच्याबाबत तर उघडपणे भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोधात काम केले. त्यांची नावे देखील मला माहिती आहेत. ती नावे मी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कळवली आहेत. मात्र, पक्षाने अजूनही कारवाई केलेली नाही. मी कारवाईची वाट पाहतो आहे’, असेही खडसे म्हणाले.

हेही वाचा – आम्हाला बाजूला ठेवल्यामुळे फडणवीस पायउतार – एकनाथ खडसे

पक्ष सोडणार नाही – खडसे

दरम्यान, एकनाथ खडसे पक्षावर नाराज असल्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात खडसे शिवसेनेत प्रवेश करणार अशीही चर्चा सुरु झाली होती. यावर खडसे यांनी आपण कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.