पवारांचा त्यांच्याही पक्षावर भरवसा नाही

Mumbai
uddhav-thackeray
उद्धव ठाकरे

शरदर पवार ऊन, पावसात सभा घेत असले तरी त्याचा मतदारांवर काडीचा परिणाम होणार नाही. पवार यांचा त्यांच्याच पक्षावर भरवसा राहिलेला नाही. रायगड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाचे शल्य मनात असून त्या पराभवाचे उट्टे या निवडणुकीत काढा. दोन्ही काँग्रेसची राहिलेली चरबी आपल्याला उतरवायची असल्याने युतीच्या कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे जाहीर सभेत जनसमुदायाला केले.

यावेळी त्यांनी आघाडीवर जोरदार शरसंधान केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुरुवारी सातारा येथे भर पावसात केलेल्या भाषणाची ठाकरे यांनी खिल्ली उडवली. सरकार जनतेशी सूड भावनेने वागत असल्याचे पवार सभांतून बोंबलून सांगत असले तरी त्याचा मतदारांवर त्याचा परिणाम होणार नाही.

पवार यांचा त्यांच्याच पक्षावर भरवसा राहिला नसल्याचे ते म्हणाले. दोन-चार आमदार निवडून आल्यानंतर ते तुमच्याशी एकनिष्ठ राहतील का, असा सवाल करीत ठाकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार कट्टर शिवसैनिक असल्याचा दावा केला. 1995 मध्ये आलेल्या युती सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांचे नंतर आघाडी सरकारने मातेरे केल्याचाही आरोप ठाकरे यांनी केला.

प्रफुल्ल पटेल यांच्या सुरू झालेल्या ईडीच्या चौकशीचा संदर्भ देत ठाकरे यांनी देशद्रोही लोकांशी ज्यांचे हितसंबंध आहेत त्यांना जनता मनावर घेईल का, असा प्रश्न उपस्थित केला. रायगड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाचे शल्य मनात असल्याचे सांगत पराभवाचे उट्टे या निवडणुकीत काढण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर व अन्य उपस्थित होते.