घरमुंबईमुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील प्रमुख लढतींकडे लक्ष

मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील प्रमुख लढतींकडे लक्ष

Subscribe

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार असून मुंबई, ठाणे, पालघरमधील काही लढतींकडे राज्याचे लक्ष लागले आहे. जो राजकीय पक्ष मुंबई, ठाण्यावर वर्चस्व प्रस्थापित करतो; तो राज्यात सत्तेत येतो, असे म्हटले जाते. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघरमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारादरम्यान आपले लक्ष केंद्रीत केले होते. त्यातही मुंबईतील वरळी, बोरिवली, दहिसर, भायखळा, मानखुर्द, विलेपार्ले, ठाण्यात ठाणे, माजिवडा, मुंब्रा, ओवळा, पाचपाखाडी या मतदार संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. तर पालघरमध्ये वसई आणि नालासोपारा या मतदार संघांबद्दल सर्वांनाच आकर्षण आहे.

मुंबईतील वरळी मतदार संघातून शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत. ठाकरे कुटुंबातील व्यक्ती प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र त्यांच्या समोर कोणतेही तगडे आव्हान नाही. दहिसर मतदार संघात भाजपच्या मनीषा चौधरी निवडणूक लढवत आहेत. मनीषा चौधरी या येथील विद्यमान आमदार आहेत. त्याच्यासमोर काँग्रेसचे अरुण सावंत निवडणूक रिंगणात आहेत. मानखुर्दमधून शिवसेनेच्या विठ्ठल लोकरेंना समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांचे आव्हान आहे. आझमी तेथील विद्यमान खासदार आहेत. तर विलेपार्ले मतदार संघातून भाजपचे पराग अळवणी निवडणूक रिंगणात आहेत. ही त्यांची दुसरी टर्म आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे जयंती सीरोया आहेत. भाजपसाठी सर्वात सुरक्षित असलेल्या बोरिवली मतदार संघातून भाजपचे सुनील राणे यांचे काँग्रेसच्या कुमार खिल्लारे यांना मोठे आव्हान आहे. भायखळामधून शिवसेनच्या यामिनी जाधव या काँग्रेसचे मधुकर चव्हाण आणि एमआयएमचे वारीस पठाण यांच्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत. वारीस पठाण येथील विद्यमान आमदार आहेत.

- Advertisement -

ठाण्यातील मुख्य लढतीत पाचपाखाडीतून मागील सलग चार टर्म आमदार असलेले आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या संजय घाडीगावकर आणि मनसेच्या महेश कदम यांचे आव्हान आहे. मुंब्रातून विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाडांसमोर शिवसेनेच्या दिपाली सय्यद निवडणूक रिंगणात आहेत. तर माजिवडा येथून शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक हे सलग तिसर्‍यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि मनसेचे संदीप पंचांगे निवडणूक लढवत आहेत. तर ऐरोली मतदार संघात भाजपचे उमेदवार गणेश नाईक आणि बेलापूर मतदार संघात भाजपचे उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

पालघर जिल्ह्यात वसई आणि नालासापोरा या दोन मतदार संघांमध्ये चुरशीच्या लढती आहेत. वसईतून बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे विजय पाटील निवडणूक लढवत आहेत. तर नालासोपारा मतदार संघातून बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांच्यासमोर प्रदीप शर्मा यांनी आव्हान आहे. सोमवारी मतदान होत असताना या मतदार संघात नेमके कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर यापैकी काही मतदार संघात कोणाला किती मताधिक्य मिळणार, हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -