‘ज्या दिवशी मनमोहन सिंग राफेलवर बोलतील, मोदी कपडे फाडत फिरतील’

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि राजनाथ सिंह यांच्यावर सोमय्या मैदानावर झालेल्या सभेमध्ये जोरदार निशाणा साधला.

Mumbai
modi ambedkar

राज ठाकरेंच्या सभा एकीकडे तुफान गर्दी खेचत असताना आज तेवढ्याच गर्दीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सभा मुंबईच्या सोमय्या मैदानावर झाली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी सत्ताधारी भाजपवर तोंडसुख घेतलं. विशेषत: राफेल विमान खरेदीमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यावर त्यांनी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोघांवर निशाणा साधला. ‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता स्वत: राहुल गांधींसारखे वागायला लागले आहेत’, असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. तसेच, राफेल विमानाखाली लिंबू ठेवल्यावरून त्यांनी संरक्षणंमत्री राजनाथ सिंह यांच्यावर निशाणा साघला.

‘मसणजोगी म्हणतो राजनाथसिंहांनी माझा धंदा बुडवला!’

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी राजनाथ सिंहांना टोला लगावला. ते म्हणाले, ‘परवा मला एक मसणजोगी भेटला. मला म्हणाला राजनाथ सिंहांनी माझा धंदा बुडवला. लिंबू घेऊन लोकांना फसवायचं काम मी करतो. पण फ्रान्सला लिंबू घेऊन हे गेले. बरं तिथे ठेवले ते लिंबूही चुकीचे ठेवले. विमानासाठी एक धारी नव्हे, दोन धारी लिंबू ठेवावे लागतात. ते भेटले तर त्यांना मीच लिंबांचं प्रशिक्षण देतो’.


हेही वाचा – आमच्या जाहीरनाम्यातले मुद्दे इतरांनी चोरले-प्रकाश आंबेडकर

‘राहुल गांधींनी राफेलवर बोलू नये’

दरम्यान, यावेळी प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यावर देखील निशाणा साधला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी आले आणि सांगितलं काय तर शरद पवारांनी कार्यकर्त्याला कशी कोपरखळी मारली. ते राहुल गांधी आले, ते सुद्धा राफेल घेऊन आले. राहुल गांधींनी स्वत: राफेलवर बोलू नये. त्यांनी त्यांच्याकडचा हुकमी एक्का म्हणजेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बोलायला सांगावं. कारण त्यांनी राफेलचा पहिला करार केला आहे. ज्या दिवशी मनमोहन सिंग राफेलवर बोलतील, त्या दिवशी मोदी कपडे फाडत फिरत असतील’, असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.