घरमहाराष्ट्र'या' माजी आमदाराने सकाळी राष्ट्रवादीचा प्रचार केला; रात्री भाजपात प्रवेश

‘या’ माजी आमदाराने सकाळी राष्ट्रवादीचा प्रचार केला; रात्री भाजपात प्रवेश

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. सकाळी अजित पवार यांच्या सोबत प्रचार करणाऱ्या माजी आमदाराने रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर अनेकांनी पक्षांतरं केली. जागावाटप, उमेदवारी या सर्व बाबी पार पडून निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. सकाळी अजित पवार यांच्या सोबत प्रचार करणाऱ्या माजी आमदाराने रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात सुनील टिंगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे. काल १४ ऑक्टोबर रोजी सकाळी सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत या मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे हेदेखील उपस्थित होते. सुनील टिंगरे यांच्या प्रचारासाठी आयोजित रॅलीत ते सहभागी झाले होते. पण रॅलीनंतर १२ तासांतच बापूसाहेब पठारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मिळालेल्या माहितीनुसार वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून बापूसाहेब पठारे हे निवडणुकीसाठी इच्छुक होते. पण राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील टिंगरे यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यामुळे बापूसाहेब टिंगरे नाराज होते, अशी चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश

सुनील टिंगरे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उमेदवार सुनील टिंगरे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी महापौर आणि प्रभारी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. पण सकाळी रॅलीत सहभागी झालेल्या बापूसाहेब पठारे यांनी विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांच्या समवेत मु्ंबईत दाखल झाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला.

कार्यकर्ते म्हणाले, तुमच्यावर अन्याय झाला

भाजपा प्रवेशाबाबत माजी आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले की, “मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रॅलीत सहभागी झालो. तेव्हा माझ्या कार्यकर्त्यांनी पक्षाने तुमच्यावर अन्याय केला म्हणून सांगितले. एवढेच नाही तर आता आम्ही पक्षाचे काम करणार नाही म्हणून कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली. कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरुन मी विचार केला. प्रत्येक बैठकीत राष्ट्रवादीने मला डावलले. एवढेच नाही तर यंदा मला उमेदवारी नाकारली. त्यामुळे मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. यापुढे मी भाजपाचेच काम करणार.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -