सत्तेचं सोनं…विचारांचं गाणंं

Mumbai

पार्कात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मेळावा भरला होता. कार्यकर्ते देखील उत्साहात होते. आचारसंहिता असली तरी पक्षाची ती परंपरा आहे आणि कोणतीही राजकीय भाषणं होत नाहीत असा पक्षाचा दावा होता, पण मेळाव्याच्या निमित्ताने का होईना सायबांनी आतापर्यंत विरोधी पक्षांची तर कधी मित्रपक्षांची पिसं काढली होती.त्यामुळे आज काय साहेब बोलणार आहेत याबद्दल कार्यकर्त्यांना उत्सुकता होती. विरोधी पक्षात असताना मोठे साहेब विरोधी पक्षांवर तुटून पडायचे…कार्यकर्ते देखील जोशात असायचे..पण त्यांच्यानंतर सत्तेत राहण्याची कसरत करणार्‍या छोट्या सायबांना कार्यकर्त्यांच्या छातीत कायम स्वाभिमान भरून ठेवणं चॅलेंज होतं. प्रत्येक मेळाव्यागणिक त्यांचं हे चॅलेंज वाढतच जात होतं.

संघर्ष, आंदोलनं यांच्यातून राजकारणात स्वत:ची जागा टिकवलेला त्यांचा पक्ष आता सरकारच्या वळचणीला जावून बसला होता. त्यात त्यांना कित्येतदा दुय्यम आणि अपमानाच्या वागणुकीला सामोरे जावे लागले होते. परंतु, हीच दुय्यम वागणूक आणि अपमान कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा परंपरागत अभिमान आणि स्वाभिमान टीकवण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे होते. गेली पाच वर्षे सायबांनी सत्तेत राहून विरोधकाची भूमिका चोख पार पाडली होती. कधी कधी सायबांच्या या अशा पॉलिटिक्सने विरोधकही चक्रावले होते तसेच वैतागले होते. यावर्षी देखील सायबांना तेवढंच मोठं चॅलेंज होतं. गेल्यावेळी याच मेळाव्यात सायबांनी स्वबळाची घोषणा केली होती आणि काही दिवसांत त्यांनी सरकारशी तह करून तलवार म्यान केली होती. त्यामुळे यावेळी म्यान केलेली तलवार पुन्हा बाहेर काढून कोणावर संधी सांधून उगारायची याचेच सायबांना टेन्शन आले होते.

दरवर्षीप्रमाणे त्याच जोशात त्याच जल्लोषात कार्यकर्ते जमले होते. घोषणांनी परिसर दुमदुमून निघत होता. वातावरण तयार झाले होते. हेच वातावरण टीकवण्याची कसरत सायबांना करावी लागणार होती.साहेब सभास्थानी आले,त्यांनी कार्यकर्त्यांचा जोश पाहिला. हाच तो उत्साह जो मला सत्तेपर्यंत नेवू शकतो,हे सायबांनी ओळखले होते. जमलेल्या माझ्या तमाम बंधू, भगिनी, मातांनो…अशी उपस्थित जनसमुदायाला साद घातली.सायबांनी पुन्हा एकदा स्वाभिमानाची गर्जना केली. हो..मला सत्ता हवीय….सायबांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना पक्षाचे ध्येय सांगितले. आपला जरी सत्तेत योग्य वाटा नसला तरी आपल्याला आता तो मिळवण्याची वेळ आली आहे,असे म्हणत सायबांनी कार्यकर्त्यांना आर्त विश्वास दिला.

त्यानंतर स्वाभिमान, अभिमान, गद्दार, मावळे, कावळे अशा अनेक मुद्द्यांवर साहेब तासभर बोलले. आपल्याच मित्रपक्षाशी आपल्याला कसे एकत्र राहणे गरजेचे आहे, हे साहेबांनी कार्यकर्त्यांना समजावले. गेल्या अनेक वर्षांपासूनच पक्षाला गळती लागू नये, नेते सत्तेकडे आकर्षिले जावू नये म्हणून साहेब स्वत:सत्तेत राहिले होते. स्वाभिमान आणि तह यांची सांगड घालताना सायबांना इतकी वर्ष एकहाती सत्तेची स्वप्न दर मेळाव्यात देण्यावाचून गत्यंतर नव्हते. कारण कार्यकर्त्यांच्या याच जोशावर ते मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीची स्वप्न पाहत आहेत.