घरफिचर्स...आणि सरांची ‘शाळा’ झाली

…आणि सरांची ‘शाळा’ झाली

Subscribe

आज शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा किलबिलाट चालू होता. मुलांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. शाळेतील नावडे सरांची आता बदली होणार होती. खरं तर शिक्षकांची बदली झाल्यावर विद्यार्थ्यांना दु:ख होतं. परंतु, नावडे सरांची गोष्ट जरा न्यारी होती. न्यारी म्हणजे एकदमच न्यारी. नावडे सर शाळेच्या स्थापनेपासून शाळेत शिकवण्यासाठी होते. परंतु, नेहमीच स्वतःमध्येच गुंतलेले असायचे. कोणालाच न जुमानता आपल्याला हवं ते आपल्याला वाटेल त्या पद्धतीने ते शाळेत शिकवायचे. गपगुमान शिकलात तर ठिक, नाहीतर विद्यार्थ्यांवर डोळे देखील वटारायचे. छडीचा वापर करण्याची धमकीही ते विद्यार्थ्यांना अधुन मधून देत असत. त्यामुळे मुलांमध्ये ते व्हिलनच झाले होते.

मुलांच्या अंगावर खेकसणे, त्यांना उडवून लावणे, त्यामुळे मुले देखील त्यांना वचकूनच असायची. एकंदरित त्यामुळेच नावडे सर शाळेत सर्व मुलांचे नावडते झाले होते. असे हे नावडे सर शाळेच्या स्थापनेपासून असल्यामुळे शाळेत त्यांना शाळेत आधी मान होता. परंतु, मुख्याध्यापक होण्याची महत्वाकांक्षा असलेल्यांपैकी ते होते. त्या पदापर्यंत पोहचले नसले तरी त्यांचा रूबाबही तसाच असायचा. सरांना वैतागलेले अनेजण सरांना उघडं पाडायचे प्रयत्न देखील करून झाले होते.

- Advertisement -

कोणी तर स्वत: सरच सातवी पास नाहीत आणि शाळेत कसे शिकवतात? असा आरोप देखील केला होता. त्यात त्यांच्या बोगस डिग्रीचा विषय देखील पुढे आला होता. कधी कधी सरांना स्वमर्जीने काही प्रयोग करायचे ठरवले तर ते आता त्यांच्यावरच उलटले जात होते. एकंदरित शिक्षणात प्रयोगशाळा करणार्‍या सरांची गेल्या पाच वर्षांपासून ‘शाळा’ होत आली होती.

गेल्या दोन वर्षांपासून नावडे सरांच्या वागणुकीत अधिकच कठोरपणा आला होता. मुख्याध्यापक सरांनी त्यांना मुलांचे पेपर तपासणीचे काम दिले होते. परंतु,त्यात देखील त्यांनी घोळ घालून ठेवला होता. सलग दोन वर्ष विद्यार्थ्यांना रिझल्टसाठी ताटकळत राहावे लागले होते. एकदा तर ढ मुलाला 80 टक्के तर हुशार विद्यार्थ्याला नापास देखील करण्याचा प्रताप त्यांनी केला होता. पालकांनी देखील सरांच्या वागणुकीचा मुख्याध्यापक सरांकडे तक्रारी केल्या होत्या. नेहमीच तक्रारींचा भडिमार होत होता. तक्रारींचा खच मुख्याध्यापक सरांच्या टेबलावर पडत होता. त्यामुळे मुख्याध्यापक सर पण त्रस्त झाले होते.

- Advertisement -

काय करावं त्यांनी काही सुचत नव्हतं. एके दिवशी त्यांनी सरांना बोलावून,त्यांची जबाबदारी काढून घेतली आणि त्यांना शारीरिक शिक्षण देण्याच्या कामात गुंतवले. त्यापासून ते मानसिकदृष्ठ्या आजारी असल्यासारखेच वागत होेते. अखेर शाळेतून त्यांची बदली झाली. वरच्या स्तरावरून सरांची बदली झाली असली तरी मुख्याध्यापक सरांचा त्यांच्या बदलीत हात होता,अशी कुजबूज शाळेचा स्टाफ आणि विद्यार्थी शेवटपर्यंत करत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -