अजित पवारांची पक्षातून हकालपट्टी होईल का? वाच काय म्हणाले शरद पवार!

शरद पवारांनी अजित पवारांच्या पक्षातून हकालपट्टीसंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. त्यामुळे आता अजित पवार राष्ट्रवादीत राहणार की बाहेर काढले जाणार? यावर चर्चा सुरू झाली आहे.

Mumbai
sharad pawar ajit pawar
शरद पवार अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना आणि पक्षातल्या आमदारांना देखील अंधारात ठेऊन अजित पवारांनी भाजपला आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला असं सांगितलं जात आहे. मात्र, हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय आहे, असं सांगत शरद पवारांनी अजूनही शिवसेनेसोबतच आहोत आणि सरकार महाविकासआघाडीचंच येईल, असं ठामपणे सांगितलं. मात्र, अजित पवारांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांची लागलीच विधिमंडळ पक्षनेतेपदावरून उचलबांगडी करण्यात आली. पण आता अजित पवारांची पक्षातून हकालपट्टी होईल का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांचा गट अजित पवारांची माघारी फिरण्यासाठी मनधरणी करत असतानाच त्यांच्या हकालपट्टीसंदर्भात शरद पवारांनी इशारा दिला आहे.

‘अजित पवारांनी पक्षाच्या बैठकीत बोलायला हवं होतं’

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमासाठी शरद पवार आज कराडमध्ये होते. त्यावेळी राज्यातल्या सत्तापेचासंबंधीच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. ‘अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देणं हा पक्षाचा निर्णय नाही. भाजपकडे बहुमत नसतानाही त्यांनी सरकार बनवलं आहे. एखाद्या व्यक्तीला त्याचं व्यक्तिगत मत असू शकतं. ते पक्षातल्या बैठकीत मांडायला हवं. पक्षातल्या इतर व्यक्तींना विश्वासात घ्यायला हवं. आता अजित पवारांच्या हकालपट्टीसंदर्भात पक्ष निर्णय घेईल’, असं ते म्हणाले.


हेही वाचा – ‘सत्ता आल्यानंतर भाजपवाल्यांसाठी वेड्यांची इस्पितळं काढू’

‘५० वर्षात असे अनेक प्रसंग पाहिले’

दरम्यान, यावेळी शरद पवारांनी सत्तास्थापनेसंदर्भात प्रबळ आशावाद व्यक्त केला. ‘अशा अनेक गोष्टी गेल्या ५० वर्षांत आम्ही पाहिलेल्या आहेत. संकटं येत असतात, त्याला माणसं सामोरे जात असतात. महाराष्ट्रातला मराठी माणूस अशा प्रसंगांना सामोरा गेल्यामुळेच भक्कम होत असतो’, असं ते म्हणाले. तसेच, ‘त्या प्रकारानंतर अजित पवारांना मी भेटलोच नाही’, असं देखील पवारांनी सांगितलं.