शिवसेनेच्या विजयाची सुरुवात कणकवलीतून होणार; संजय राऊतांचा इशारा

Mumbai
sanjay raut speech in dussehra melava
शिवसेनेचे खासदार संजय राऊत

आगामी विधानसभेच्या निकालात शिवसेनेच्या विजयाची सुरुवात कणकवली मतदारसंघातून व्हावी, अशी अपेक्षा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. राज्यात शिवसेना-भाजपची युती झाली असली तरी कणकवली मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेने आघाडी उघडली असल्याचे दिसून येत आहे. “शिवसेनेच्या जे जे अंगावर आले, शिवसेना संपविण्याची ज्यांनी भाषा केली, ते लोक आज घायाळ झाले आहेत. मग कोकण, नवी मुंबई किंवा येवला असेल या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार जिंकून येईल, अशी ग्वाही संजय राऊत यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना दिली.

मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा ५४ वा दसरा मेळावा संपन्न झाला. यावेळी खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला. कणकवलीमधून नितेश राणे भाजपच्या तिकीटवर निवडणुकीसाठी उभे आहेत. मात्र शिवसेनेने अपक्ष उमेदवार सतीश सावंत यांना पाठिंबा दर्शवल्यामुळे कणकवलीच्या निवडणुकीमध्ये ट्विस्ट आला आहे.

पुढच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या बाजुला मुख्यमंत्री बसणार

“भाजप-सेनेची युती झाल्यामुळे आता शिवसेना शांत आहे. युतीमध्ये जरा जपून बोलावे लागते. आम्ही मित्रत्व पाळतो. शिवसेना १२४ जागा लढवत आहे, यावर उद्धव ठाकरेंशी बोललो असता ते म्हणाले की, आकड्यात आणि वाकड्यात जाऊ नकोस. शिवसेना संपुर्ण १२४ पैकी १२४ गड जिंकणार असा प्रण आज आपण करायचा आहे. पुढच्यावर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या बाजुला बसलेला दिसेल”, असेही संजय राऊत म्हणाले.