काँग्रेस-राष्ट्रवादीचा मित्रपक्षांना ठेंगा!

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी एकीकडे सत्ताधारी भाजप-शिवसेनेला खाली खेचण्याचा चंग बांधून मैदानात उतरलेली असतानाच मित्रपक्षांना मात्र त्यांनी वाटाण्याच्या अक्षताच लावल्याचं दिसून येत आहे.

Mumbai
congress ncp alliance

विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांना ३८ जागा सोडण्याचे जाहीर करणाऱ्या काँग्रेस आघाडीने प्रत्यक्षात मित्रपक्षांना ठेंगाच दाखवला आहे. दोन्ही काँग्रेसने शेतकरी कामगार पक्षासह जनता दल, कम्युनिस्ट पक्षाला वाऱ्यावरच सोडल्याने शिवसेना-भाजप महायुतीच्या विरोधात महाआघाडी उभी करण्याच्या प्रयत्नांना आघाडीकडूनच खीळ बसली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ आणि घटक पक्षांना ३८ जागा सोडणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच केली होती. मात्र, प्रत्यक्षात उमेदवारी जाहीर करताना दोन्ही काँग्रेसचा उडालेला गोंधळ आणि एबी फॉर्मचा घोळ, यामुळे घटक पक्षांच्या वाट्याला समाधानकारक जागा आलेल्या नाहीत. त्यामुळे छोटे पक्ष दोन्ही काँग्रेसवर नाराज आहेत.

सपाला सांगितल्या ३, दिल्या २!

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने १० ते १२ जागा मागितल्या होत्या. त्यापैकी प्रत्यक्षात शिराळा, मिरज आणि वरूड-मोर्शी अशा तीनच जागा शेट्टींना देण्यात आल्या आहेत. नंदूरबार आणि खामगाव या जागा स्वाभिमानीला सोडल्या होत्या. परंतु, काँग्रेसने या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन समाजवादी पक्षाला तीन जागा सोडणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात सपच्या पदरात दोनच जागा पडल्या आहेत. भिवंडी पूर्व मतदारसंघ देण्याचे आश्वासन देऊनही काँग्रेसने येथे उमेदवार दिला आहे.


हेही वाचा – शिवसेनेच्या आदित्यसोबत आता भाजपचाही ‘आदित्य’, २ सभा घेणार!

जनता दल सेक्युलर स्वबळावर लढणार

यासोबतच, शेतकरी कामगार पक्षाने सांगोल्यासह रायगड जिल्ह्यातील काही जागा सोडण्याची मागणी केली होती. परंतु, राष्ट्रवादीने सुरूवातीला सांगोल्यात दीपक साळुंखेंना उमेदवारी दिली. पण नंतर ती मागे घेण्यात आली. पेण, अलिबाग, महाडमध्ये काँग्रेसने तर कर्जत, श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीने उमेदवार उभे केले आहेत. जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडची एकमेव जागा मागितली होती. परंतु, ती जागाही न सोडल्याने जनता दलाने लोहा, मालाड, परांडा, मिरज, खानापूर आणि जत या जागा आता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. विधानपरिषद सदस्य कपिल पाटील यांनी आघाडीकडे गोरेगावची जागा मागितली होती. मात्र ती नाकारण्यात आली. दोन्ही कम्युनिस्ट पक्षाला देखील आघाडीने वाटाण्याच्या अक्षताच लावण्यात आल्या आहेत.