तुझ्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

आडाम मास्तरांची जीभ घसरली

Solapur
Narasiah Adam

राज्यभरात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. प्रसारासभांचा धडाका सुरू आहे. भाषणांमध्ये उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतांना मात्र काही वेळा त्यांची जीभ घसरते. सोलापुरातही असाच प्रकार घडला. सोलापूर शहर मध्यम मतदारसंघामधून राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. यावेळीही त्यांच्या विरोधात ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार नरसय्या आडम हे अपक्ष उभे आहेत. त्यांनी प्रचारादरम्यान प्रणिती शिंदे यांना ‘तुझ्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’ अशी धकमीच दिली.

सोलापूर शहर मध्यम मतदारसंघामधून प्रणिती यांच्याविरोधात ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम निवडणुकीच्या मैदानात उभे राहिले आहेत. आडम मास्तर म्हणून ओळखले जाणारे नरसय्या यांचा एका सभेदरम्यान तोल सुटला आणि त्यांनी प्रणिती यांना थेट धमकीच दिली. ‘तुझ्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय आडम मास्तर शांत बसणार नाही. जो पंतप्रधानाला सोलापूरामध्ये आणण्याची ताकद ठेवतो तो कोणालाही तुरुंगामध्ये घालू शकतो,’ असे आडम मास्तर आपल्या भाषणात म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी माझ्यावर 170 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल असून हा आकडा 200 झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असेही सांगितले. ‘हे गुन्हे म्हणजे माझ्यासाठी अलंकार आहेत,’ असे वक्तव्यही आडम यांनी केले. आडम यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.