विरोधक उरले नाहीत मग दिल्लीचा फोजफाटा कशासाठी? सुप्रिया सुळेंचा सवाल 

महाराष्ट्रात एकही विरोधक उरला नसल्याचे मुख्यमंत्री सगळीकडे सांगत आहेत. जर तसं असेल तर मग केंद्रासह उत्तरप्रदेश, राजस्थान या राज्यातील इतके मंत्री इकडे कशासाठी येत आहेत?, असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Mumbai
Supriya Sule
राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे
महाराष्ट्रात एकही विरोधक उरला नसल्याचे मुख्यमंत्री सगळीकडे सांगत आहेत. जर तसं असेल तर मग केंद्रासह उत्तरप्रदेश, राजस्थान या राज्यातील इतके मंत्री इकडे कशासाठी येत आहेत?, असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी कल्याण पूर्वेत भाजपवर टिका केली आहे.

लोकांना रोजगार मिळाले का?

कल्याण पूर्वेतील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश तरे यांच्या प्रचारसभेसाठी कल्याण पूर्वेत सभा झाली. त्यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टिका केली. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर टिका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘सध्या विधानसभा प्रचारासाठी शहा वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. मात्र, कोल्हापूर, सांगलीला एवढा मोठा पूर आला होता. त्यावेळी एकदा पण यावसं वाटलं नाही का? गेल्या ५ वर्षांत या सरकारने कोणता चांगला बदल केला? महागाई कमी झाली का? लोकांना रोजगार मिळाले का?, असे विविध सवाल सुळे यांनी यावेळी उपस्थित केले. कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची दुर्दशा आणि खड्ड्यांमुळे इकडे यावेसे वाटत नाही, असे सांगत त्यांनी इथल्या लोकप्रतिनिधी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवरही टीकास्त्र सोडले आहे.