पैसे घेऊन नव्हे सर्व्हेक्षणाच्या आधारेच दिली जाते उमेदवारी

जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आर्थिक आरोपांचे खंडन, सर्व्हेक्षणाच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह

girish mahajan
गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण

नाशिक पूर्वमधून उमेदवारी डावलण्यात आलेल्या बाळासाहेब सानप यांच्या कार्यकर्त्यांकडून आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप झाल्यानंतर जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आरोपांचे खंडन करत, आर्थिक नव्हे तर सर्व्हेक्षण निकषाच्या आधारेच उमेदवारी दिल्याचे स्पष्ट केले. बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरले असले तरीही माघारीपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांना तिकिट नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरला. भाजपने सानपांच्या जागेवर मनसेमधून भाजपवासी झालेल्या राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सानपांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांवर आर्थिक देवाण-घेवाणीचे आरोप केले. यासंदर्भात नाशिक दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्र्यांना विचारले असता, त्यांनी उमेदवारीसाठी आर्थिक नव्हे तर पक्षाने केलेले सर्वेक्षण महत्त्वाचे ठरत असते. त्यानुसारच उमेदवारी दिली जाते, या शब्दांत आरोपांना प्रत्युत्तर दिले. भाजपमध्ये पैसे घेऊन कधीही उमेदवारी दिली जात नाही. तशी पद्धतही नाही. तिकिट नाकारल्याने नाराज कार्यकर्ते तसे बोलत असतील. एकाला तिकिट मिळाल्यास चार जण नाराज होणे हे स्वाभाविक आहे. बंडखोरांची नाराजी दूर करत त्यांच्या माघारीसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

..मग सर्व्हेक्षण गेले कुठे

पालकमंत्री महाजन यांनी वारंवार उमेदवारीसाठी सर्व्हेक्षणाचा उल्लेख केला. तावडे आणि खडसे यांच्याबाबत काहीअंशी तशी परिस्थिती असली तरीही गुणानुक्रमे दुसर्‍या स्थानावर असलेल्या बावनकुळेंच्या बाबतीत सर्व्हेक्षण गेले कुठे, असा सवाल भाजपच्याच वर्तुळातून उपस्थित केला जातो आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांची माहिती कमी पडली की सर्व्हेक्षणाचा अंदाज चुकला, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.