घरमहाराष्ट्रमतांचा पाऊस कोणाच्या बाजूने?

मतांचा पाऊस कोणाच्या बाजूने?

Subscribe

गेले महिनाभर सुरु असलेला विधानसभा निवडणुकीचा धुरळा आता खाली बसला असून महाराष्ट्रातील जनता लोकशाहीच्या उत्सवासाठी सज्ज झाली आहे. पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तर राज्यातील जनतेच्या मनात काही तरी वेगळे आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधार्‍यांचे एकतर्फी लढतीचे मनसुबे सफल होणार नाहीत, असे भाकित केले आहे. राज्यभर गेले दोन दिवस पाऊस पडत असून सोमवारीही पाऊस बरसणार असून मतांचा पाऊस कोणाच्या बाजूने पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सभा, रोड शो आणि प्रचार रॅली, पदयात्रा या माध्यमातून सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचाराचे रान उठवले होते. शेवटच्या दोन दिवसांत तर भर पावसात प्रचार करतानाही नेत्यांनी मागेपुढे पाहिले नाही. वयाच्या 79 व्या वर्षी शरद पवार यांनी सातारा आणि कर्जत जामखेड येथे भर पावसात सभा घेत विपरीत परिस्थितीतही विरोधक मागे हटलेले नाहीत हे दाखवून दिले. काँग्रेस थंड बस्त्यात जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांनी भाजप आणि शिवसेनेसमोर आव्हान उभे करत निवडणुकीत रंगत भरली आहे.

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर थेट देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या पाच वर्षांच्या कारभाराचा पंचनामा करताना विरोधकांच्या आशा उंचावल्या आहेत. प्रभावी आणि मुद्देसूद भाषण यांनी पुन्हा एकदा राज हे राज्यातील एका नंबरचे वक्ते ठरले आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीचे मैदान गाजवताना राज यांनी निवडणुकीत रंगत भरली आहे. नेहमीप्रमाणे राज यांच्या सभांना मोठा प्रतिसाद लाभला आहे. आता त्याचे मतात रूपांतर होऊन 2009 प्रमाणे मनसे मोठे यश मिळवणार की 2014 सारखे फक्त एका आमदारावर समाधान मानावे लागणार हे गुरुवारी 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर झाल्यानंतर कळेल. एकमात्र खरे की राज यांनी अपेक्षांचा फुगा फुगवला नाही. सक्षम विरोधी पक्ष म्हणून मतदारांनी मनसेचा विचार करावा, असे आवाहन मतदाराना केले असून लोकांच्याही ते मनात भरल्यासारखे दिसत आहे.

देवेंद्र फडणवीस याची तुफान फटकेबाजी, उद्धव ठाकरे यांची मतदारांना पुन्हा एकदा मंत्रालयावर भगवा फडकवण्याचे केलेले आवाहन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय मंत्र्यांची राज्यात उतरलेली फौज यामुळे राज्यात महायुतीचे वादळ घोंगावत होते. निवडणूकपूर्व अहवालही महायुतीच्या बाजूने जात असल्याने पुन्हा एकदा फडणवीस सरकार येणार असे वातावरण तयार झाले आहे. विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेनेचे मिळून 222 आमदार निवडून येणार असा आत्मविश्वास सत्ताधारी व्यक्त करत आहेत. मात्र गेल्या पाच वर्षात सत्ताधार्‍यांनी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत, असा आरोप करत विरोधकांनी करून बदलाचे आवाहन केले आहे. मंदीची लाट, बंद पडत चाललेले कारखाने आणि उद्योग, बेरोजगारी, नोटाबंदी, सिंचनाचे अपुरे राहिलेले प्रकल्प, आचके खात असलेली शेती आणि पाच वर्षात 14 हजार शेतकर्‍यांनी केलेल्या आत्महत्या यामुळे महायुती सरकारवर लोकांचा रोष आहे. मात्र प्रत्यक्षात हा राग मतदानात उतरतो की, नाही यावर सरकारच्या यशापशाचा आलेख अवलंबून आहे.

- Advertisement -

मतदानावर पावसाचे सावट
महाराष्ट्रातून मान्सूनची ‘एक्झिट’ झाली असली तरी मान्सूनोत्तर पावसाची पुन्हा एकदा रिपरिप सुरू झाली आहे. मुंबईसह उपनगरासह संपूर्ण राज्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. तसेच उद्या, सोमवारी सह्याद्रीच्या पूर्व आणि पश्चिम उतारावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि परिसरातही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यात महाराष्ट्रात सोमवारी 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यभरात मतांचा पाऊस पडणार की, मुसळधार पाऊस पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -