घरमुंबईरात्री उशिरा उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; फॉर्म्युल्यावर चर्चा?

रात्री उशिरा उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; फॉर्म्युल्यावर चर्चा?

Subscribe

शुक्रवारी दिवसभर राज्यात सत्तास्थापनेसंदर्भात घडामोडी घडणार असून त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री उशिरा उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, या भूमिकेवर ठाम असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री उशिरा सिल्व्हर ओकवर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेनेचे खासदार संजय राऊतदेखील त्यांच्यासोबत होते. गुरुवारी दिवसभर दिल्लीमध्ये राजकीय घडामोडी झाल्यानंतर संध्याकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्यासाठी तयार असल्याचं पत्रकार परिषदेत जाहीर केलं. त्यानंतर मातोश्रीवर हालचाली वाढल्या आणि रात्री उशिरा खुद्द उद्धव ठाकरेंनी थेट सिल्व्हर ओक गाठले. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून आज संध्याकाळी महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये सत्तास्थापनेसंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दोन्ही पक्षांनी पाठिंबा देण्याचं जाहीर केल्यानंतर रात्री उशिरा मुंबईत उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासोबत शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची नेतेमंडळी दुपारी उद्धव ठाकरेंची भेट घेणारच होती. मात्र, तरीदेखील स्वत: उद्धव ठाकरे शरद पवारांच्या निवासस्थानी रात्री उशिरा दाखल झाल्यामुळे त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आपापसात सत्तावाटपासंदर्भात एकमत झालं असून आता त्यासंदर्भात शुक्रवारी म्हणजेच आज शिवसेनेशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतरच संध्याकाळी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाणार आहे. ही महाविकास आघाडीतल्या पक्षांची पहिलीच संयुक्त पत्रकार परिषद असेल.

आजचा दिवस राजकीय घडामोडींचा

आज दिवसभर सत्तास्थापनेसंदर्भात मोठ्या घडामोडी घडणार असून सगळ्यात आधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीतल्या इतर मित्रपक्षांची बैठक होणार आहे. धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ही बैठक दुपारी १२ वाजेच्या सुमारास होण्याची शक्यता आहे. त्याचदरम्यान, सकाळी १० वाजता मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची बैठक होणार आहे. दुपारी १.३० वाजता पुन्हा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची बैठक होईल. तर संध्याकाळी ४ वाजता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र बैठक होणार आहे. ही बैठक यशस्वी झाली, तर संध्याकाळी ६ वाजता तिनही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद होईल.


हेही वाचा – मातोश्री ‘चाणक्य’ बदलतेय का?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -