घरमुंबईअखेर उद्धव ठाकरेंनी सांगितलं नक्की काय ठरलं होतं भाजप-शिवसेनेत!

अखेर उद्धव ठाकरेंनी सांगितलं नक्की काय ठरलं होतं भाजप-शिवसेनेत!

Subscribe

गेल्या १४ दिवसांपासून राज्यात सत्तास्थापनेवरून सुरू असलेला गोंधळ अवघा महाराष्ट्र पाहात असताना नक्की शिवसेना आणि भाजपमध्ये काय ठरलं होतं? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये ‘अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असं काही ठरलंच नव्हतं’, या आपल्या दाव्याचा पुनरुच्चार केलेला असतानाच त्यानंतर उद्धव ठाकरेंनी नक्की काय ठरलं होतं? याचा घटनाक्रमच माध्यमांसमोर ठेवला. काय घडलं होतं भाजप आणि शिवसेनेच्या बोलणीवेळी याची सविस्तर माहिती उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दिली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीवेळी अमित शहा, देवेंद्र फडणवीस आमच्याकडे आले. चर्चा सुरू असताना जेव्हा उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव आला, तेव्हा मी म्हटलं उपमुख्यमंत्रीपदासाठी युती करायला मी काही लाचार नाही. शिवसेनाप्रमुखांना शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचं वचन मी दिलं होतं. ते वचन मी पाळणार. त्यासाठी मला देवेंद्र फडणीस किंवा अमित शहा यांच्या मदतीची गरज नाही. मी निघून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत मला फोन आला. काय करायचं. तेव्हा मी म्हटलं माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे. नंतर अमित शहांचा फोन आला आणि म्हणाले ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री. मी म्हटलं याच सूत्राने आपण २५ वर्ष एकमेकांना खड्ड्यात टाकत आलो. पाडापाडी होते आणि मग तुला ना मला, आणि मग दुसराच कुणीतरी डोक्यावर येऊन बसतो. मला सत्ता, जागावाटप समसमान हवं आहे आणि मुख्यमंत्रीपद देखील अडीच अडीच वर्ष हवं आहे. तेव्हा ते म्हणाले, जेव्हा तुमचा सीएम असेल, तेव्हा तुम्ही आम्हाला कन्सिडर करा, आमचा सीएम असेल, तेव्हा आम्ही तुम्हाला कन्सिडर करतो. मी ठीक आहे म्हणालो. त्यानंतर जेव्हा अमित शहा मातोश्रीवर आले, तेव्हा शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत गेल्यावर मला म्हणाले, ‘माझ्या काळात आपले संबंध बिघडले, आता माझ्याच काळात ते पुन्हा सुरळीत करायचे आहेत’. मी म्हटलं तुमचं जे ठरलंय, ते तुमच्या लोकांना सांगा. त्यानुसार त्यांनी देवेंद्र फडणवीसजींना हे सांगितलं. फक्त फडणवीस तेव्हा म्हणाले की आत्ताच जर मी मुख्यमंत्रीपदाविषयी बोललो, तर पक्षात मला अडचण होईल. तुम्ही माझ्यावर सोपवा, मी शब्दांमध्ये बरोबर मांडतो. त्यानंतर शब्दांचे खेळ त्यांनी केले. त्यांनी सांगितलं पद आणि जबाबदारी यांचं समसमान वाटप. मग मुख्यमंत्री हे पद आणि जबाबदारी नाही का?’

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात पुढचे सरकारही भाजपचे असणार; मात्र घोडेबाजार करणार नाही-फडणवीस

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी हे स्पष्ट केल्यानंतर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंचे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘भाजपला कुणी खोटं पाडायचा प्रयत्न करू नये. आमच्यासाठी सत्तेपेक्षा सत्य महत्वाचं आहे’, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -